कोल्हापूर : वाराणसीहून चार प्रवासी घेऊन विशेष विमान सोमवारी सकाळी पावणे बारा वाजता कोल्हापूरविमानतळावर आले. येथून दुपारी ते कोलकात्याला रवाना झाले. त्यातून वीस प्रवासी गेले.
वैद्यकीय उपचारासाठी वाराणसी येथून एका रुग्णाला घेऊन तिघेजण या विशेष विमानाने कोल्हापूरमध्ये आले. ही सेवा पुरविणाऱ्या विमान कंपनीने वाराणसी ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते कोलकाता असे हे विमान जाणार असल्याची माहिती प्रवाशांना दिली होती. त्याला प्रतिसाद देत कोल्हापूरमधून २० जणांनी नोंदणी केली.
दुपारी तीन वाजता ते या विमानाने कोलकात्याला रवाना झाले. या विशेष विमान सेवेलादेखील कोल्हापूरमधून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोल्हापूरहून विमान सेवा नियमितपणे सुरू असल्याचे कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कटारिया यांनी सोमवारी सांगितले.