कोल्हापूर : शहरातील अरुंद रस्ते, वाहतुकीची होणारी कोंडी लक्षात घेता मोठ्या बसेसना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आर्थिक नुकसानीचा भार मोठ्या प्रमाणात सोसावा लागत असल्याने पर्याय म्हणून २० सीटर बसेस घेण्याचा विचार के.एम.टी. प्रशासनासमोर आला आहे. चार दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकारी तसेच परिवहन समितीचे सदस्य यांच्यासमोर एका खासगी कंपनीने या २० सीटर बसेसचे सादरीकरण करून दाखविले. मात्र, प्रशासनाने अद्याप त्याबाबत कोणताच निर्णय घेतलेला नाही.
कोल्हापूरकरांच्या सेवेतील सुवर्णमहोत्सव साजरा करणाºया के.एम.टी.च्या आर्थिक तोट्याचा आलेख काही कमी होत नाही. अनेक प्रयत्न करूनही के.एम.टी.ला रोज दोन ते सव्वादोन लाखांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे कर्मचाºयांचे पगार वेळेवर होत नाहीत. तसेच तातडीने सुटे भाग उपलब्ध होत नाहीत; म्हणून अलीकडे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढत आहे म्हणून के.एम.टी.चे अधिकारी, परिवहन समितीचे सदस्य काही ना काही उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करत आहेत;परंतु तोट्याचा आकडाच भरुन येत नसल्याने आर्थिक परिस्थिती सुधारत नाही.
केंद्र सरकारच्या अर्थसाहाय्यातून घेण्यात आलेल्या बसेसचा दर्जा खराब असल्यामुळे त्यांच्या नादुरुस्तीचा तसेच अॅव्हरेज कमी पडत असल्यामुळे इंधनाचा खर्च वाढला आहे. या सगळ्या अडचणींवर मात करण्याकरिता शहरात फिरविण्याकरिता २० सीटर बसेस घेण्याचा विचार सरू झाला आहे. शहरातील अरूंद रस्ते, सतत होणारी वाहतुकीची कोंडी यांवर उपाय म्हणून जादा मायलेज देणाºया आणि शहराच्या कोणत्याही रस्त्यांवर अगदी सहज धावू शकतील अशा २० सीटर बसेसचा पर्याय समोर आला आहे.
चार दिवसांपूर्वी परिवहन सभापती राहुल चव्हाण, महापालिकेचे उपायुक्त मंगेश शिंदे, प्रभारी सहायक आयुक्त संजय सरनाईक यांच्यासह सर्वच परिवहन सदस्यांसमोर या बसेसचे सादरीकरण झाले. बसचे अॅव्हरेज, प्रवासी क्षमता आणि एका बसपासून मिळणारे उत्पन्न या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. एकदा बसेस घेण्याचा निर्णय झाला तर राज्य सरकारकडून पोलीस कर्मचाºयांच्या भाड्यापोटी मिळालेल्या २ कोटी १८ लाख रुपयांच्या रक्कमेतून त्या घेता येऊ शकतात. मात्र प्रशासनाने त्यास होकार देणे आवश्यक आहे.बसेस दुरुस्तीसाठी ३२ लाखांचा निधी‘केएमटी’च्या ताफ्यातील सुमारे १९ बसेस गेल्या काही दिवसांपासून स्पेअर पार्टअभावी बंद आहेत. किरकोळ स्पेअरपार्टमुळे बसेस बंद राहणे परवडणारे नाही. म्हणून ३२ लाख रुपये परिवहन समितीने उपलब्ध करून दिले आहेत. पुढच्या आठ दिवसांत या सर्व बसेस रस्त्यांवर धावतील अशी अपेक्षा आहे.प्रशासनाने प्रस्ताव तयार करून परिवहन समितीकडे दिल्यास २० सीटर बसेस घेण्यात येतील. मात्र, अजून तसा कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र भविष्यकाळात प्रवाशांच्या सोयीस्तव या बसेस घेणे आवश्यक ठरेल.- राहुल चव्हाण,सभापती, परिवहन समिती