कोल्हापूर : कोल्हापूर व हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघांत मतदारसंघ व मतदारसंख्या जास्त असल्याने १४ ऐवजी २० टेबलांवर मतमोजणी करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. त्याला गुरुवारी निवडणूक आयोगाने मान्यता दिल्याचे कळविले आहे. या निर्णयामुळे टेबलसंख्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सहाने वाढल्याने मतमोजणी प्रक्रिया वेगाने करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघांत एकूण १२० टेबल लागणार आहेत.येत्या २३ मे रोजी मतमोजणी आहे. ईव्हीएमसोबतच व्हीव्हीपॅटवरील मते रॅँडम पद्धतीने मोजली जाणार आहेत. तथापि कोल्हापूर, हातकणंगले या दोन्ही मतदारासंघांत राज्यातील उच्चांकी मतदान आणि मतदारसंघांची संख्या जास्त असल्याने अंतिम निकाल वेळेत मिळण्यासाठी पूर्वीची १४ टेबलांची रचना अपुरी पडत होती. निवडणूक विभागाने या संदर्भात निवडणूक आयोगाकडे टेबल वाढविण्यासंबंधी मागणी केली. गुरुवारी निवडणूक आयोगाने कोल्हापूर, हातकणंगलेसह मावळ, पनवेल, चिंचवड मतदारसंघांतही जादा टेबल लावण्यास मान्यता दिली आहे.या निर्णयामुळे या दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी ६० याप्रमाणे १२० टेबल लागणार आहे. त्यात व्हीव्हीपॅटच्या स्वतंत्र टेबलांची आणखी भर पडणार आहे. त्यामुळे एका मतदारसंघात प्रत्येकी २० टेबल असले तरी त्यात व्हीव्हीपॅटसह निरीक्षकांच्या दोन टेबलची भर पडून ती २३ इतकी होणार आहे.
साधारणपणे दुपारपर्यंत मतमोजणी पूर्ण होईल, असा अंदाज गृहीत धरून ही टेबलसंख्या वाढवण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे; पण व्हीव्हीपॅटच्या स्वतंत्र मोजणीमुळे आणखी कालावधी लागणार असल्याने अंतिम निकाल लांबण्याचीच चिन्हे दिसत आहेत.
‘लोकमत’चे वृत्त खरे ठरलेमतमोजणीसाठी २० टेबलची गरज लागणार असल्याने तसा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठविला असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले. ८ मेच्या अंकात प्रस्ताव पाठविल्याचे वृत्त दिले, तर १४ मेच्या अंकात २० टेबलांवरच मतमोजणी होणार, असे वृत्त सर्वप्रथम दिले. निवडणूक आयोगाने गुरुवारी हा प्रस्ताव मान्य केल्याने ‘लोकमत’च्या विश्वासार्हतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले.
तयारी निकाल ऐकविण्याचीयेत्या २३ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतमोजणीचा कल लवकरात लवकर कळावा म्हणून मोजणी केंद्राबाहेर निवडणूक विभागातर्फे ध्वनिक्षेपक लावण्यास सुरुवात झाली आहे.