कोल्हापूर - अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी तरूणास आज, शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. या शिक्षेसोबत ५० हजारांचा दंडाची शिक्षाही सुनावली. भागोजी विठ्ठल बाऊदणे (वय ३७) असे त्याचे नाव आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिले.याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी बाऊदणे याने २०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीस नवीन घड्याळ घेऊन देतो असे सागून जंगलात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही बाब घरातील कोणास सांगितलीस तर तुला आणि तुझ्या आई, बहिणीस जीवे ठार मारीन अशी धमकी दिली होती. या घटनेनंतर पुन्हा मुलीबरोबर असे वागण्याचा प्रयत्न केला.
यावरून पिडीताच्या आई व आरोपी भागोजी यांच्यात वादावादी झाली. यात त्याने पिडीताच्या आईस मारहाण केली. याबाबतची तक्रार पिडीताच्या आईने पोलिसांत केली. खटल्याचे काम जिल्हा व सत्र न्यायाधीश (वर्ग-१) एस.आर.पाटील यांच्या न्यायालयात सुरु झाले. सरकार पक्षातर्फे ॲड. अमिता कुलकर्णी यांनी बाजू मांडली.दोन्ही बाजूंच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने भागोजी याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. यामध्ये दंडातील ४० हजार रूपये पिडीतेस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. सरकार पक्षाला ॲड. महेंद्र चव्हाण, ॲड. भारत शिंदे, तपासी अधिकारी उपनिरीक्षक व्ही.एन. रेळेकर, सहायक फौजदार शाम बुचडे, पैरवी अधिकारी शंकर माने यांचे सहकार्य लाभले.