विश्वास पाटीलकोल्हापूर : दोन महिन्यांपूर्वी स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँकेत सत्तांतर झाल्यानंतर बँकेच्या कामकाजाबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी सुरू झाल्या असून, सुमारे दोनशे कोटींच्या ठेवी ठेवीदारांनी काढून घेतल्या आहेत. अन्यायकारक बदल्या, संचालक मंडळाचे आडमुठेपणाचे धोरण आणि बँकेच्या हिताविरुद्धच्या कारभाराचा निषेध म्हणून राज्यभरातील सर्व ६० शाखांतील व्यवहार आज मंगळवारपासून बंद ठेवले आहेत.आशिया खंडातील कामगारांची सर्वांत मोठी बँक अशी एकेकाळी ओळख असलेल्या या बँकेचा कारभार सध्या लहरीनुसार सुरू असल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत बँकेत ॲड. गुणवंत सदावर्ते यांचे नेतृत्व आलेले सर्व १९ संचालकांचे पॅनेल निवडून आले आहे. त्यांनी कामगार संघटनेचे नेते हनुमंत ताटे यांच्याकडून ही बँक काढून घेतली आहे. बँकेचे राज्यभरात ८३ हजार सभासद आहेत. निवडणुकीत ५ ते ६ पॅनेल रिंगणात होती. त्यातील मतविभागणीचा फटका सत्तारूढांना बसला. सत्तांतर झाल्यानंतर बँकेचा कारभार ही बँक खासगी मालमत्ता असल्यासारखा सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.बँकेच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना ७.५० टक्के दराने कर्ज मंजूर केले आहे. एवढ्या कमी दराने सध्या कुठेच कर्ज उपलब्ध नाही. साडेसात टक्के दराने कर्ज आणि सरासरी ८ ते ९ टक्के दर हा ठेवीवरील व्याजाचा आहे. अशा पद्धतीने जर व्यवहार सुरू राहिले तर बँक बुडायला फार दिवस लागणार नाही, अशी कर्मचाऱ्यांना भीती आहे. एवढ्या कमी दराने कर्जपुरवठा करण्यास बँक व्यवस्थापनाने सहकार खाते किंवा रिझर्व्ह बँकेची परवानगी घेतली नसल्याचे कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे. याचा परिणाम म्हणून मागच्या काही दिवसांत सुमारे दोनशे कोटींच्या ठेवी ठेवीदारांनी काढून घेतल्या आहेत.दृष्टिक्षेपात बँक
- स्टेट ट्रान्स्पोर्ट को-ऑप. बँक
- शाखा : राज्यभरात ६०
- कर्मचारी : २८८
- उलाढाल : ५ हजार कोटी
- ठेवी : २२ हजार कोटी
मेहुणेच केले एमडीएवढी मोठी उलाढाल असलेल्या बँकेचा व्यवस्थापकीय संचालक म्हणून सदावर्ते यांनी स्वत:चे मेहुणे सौरभ पाटील यांची नियुक्ती केली आहे. ते अवघे २२ वर्षांचे आहेत. त्यांना बँकिंग क्षेत्राचा कोणताही अनुभव नसताना तब्बल सव्वालाख मानधनावर त्यांना ही संधी दिल्याने कर्मचाऱ्यांत नराजी आहे. आतापर्यंत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हेच बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहत असत. त्या नियमालाही तिलांजली दिली आहे.