समीर देशपांडेकोल्हापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून १२ ऑगस्ट रोजी राज्यातील बचत गटांना २०० कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्य प्रदेशमधून देशभरातील सर्व महिला बचत गटांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत.महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला आर्थिक साक्षर व्हाव्यात, त्यांनी दैनंदिन व्यापातून सवड काढून आठवड्यातून किमान एक वेळ एकत्र यावे, यातून त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि विचारांचे आदान-प्रदान व्हावे, यासाठी महिला बचत गटांची स्थापना करण्यात आली. या बचत गटांना फिरता निधी देण्याच्या या कार्यक्रमामध्ये ३४ जिल्ह्यातील बचत गटांना हा निधी प्रदान करण्यात येणार आहे.यासाठी गेले आठवडाभर महाराष्ट्रातील जे महिला बचत गट पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत योग्य प्रकारे ऑनलाइन नोंद झालेले नाहीत, त्यांची नोंद करून घेण्यात येत आहे. सोमवार, दि. ७ ऑगस्टपर्यंत प्रत्येक जिल्ह्याने राज्य पातळीवर या महिला बचत गटांचे प्रस्ताव पाठवायचे असून, मंगळवारी लेखा विभागाकडून या सर्व बचत गटांना ऑनलाइन निधी अदा करणे शक्य आहे का, याची तपासणी केली जाईल. जेणेकरून १२ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये या सर्व बचत गटांना निधी प्रदान करता येणार आहे. या अनेक जिल्हा परिषदांमध्ये शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे.
- महाराष्ट्रातील एकूण बचत गट ५,९५,९४६
- पीएफएमएस अंतर्गत कार्यान्वित नसलेले बचत गट ८७,६८८
- तालुका पातळीवर पडताळणी केलेले बचत गट ३८,८७३