भीमगोंडा देसाई कोल्हापूर : पीएम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याचे २००० रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आशा आहे की, आपणास शेतीच्या गरजा पूर्ण करण्यास याची मदत होईल, असा थेट पंतप्रधानांचा संदेश आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्यक्षात दोन हजार रुपये जमा झाले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. यासंबंधीची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करूनही लाभ मिळत नसल्याचा अनुभव आहे. परिणामी संबंधित शेतकरी महसूल आणि कृषी प्रशासनाकडे चकरा मारत आहेत. पण दोन्ही प्रशासनाकडून बेजबाबदार उत्तरे मिळत आहेत.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात दोन हजारांप्रमाणे तीन हप्ते दिले जातात. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होते. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीच्या पातळीवर प्रचंड गोंधळ आहे. कृषी विभाग महसूलकडे बोट दाखवते, महसूल कृषिकडे योजना असल्याचे सांगते, यामुळे सामान्य शेतकऱ्याला दोन्ही विभागाकडून न्याय मिळत नाही.
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून २९ फेब्रुवारी २०२४ रोजी पीएम किसानचा १६ वा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठा गाजावाजा करून वर्ग करण्यात आला. तसा संदेशही आला. केंद्र आणि राज्य शासनाचे दोन्ही संदेश आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नसल्याचे कृषी आणि महसूल प्रशासनाकडे विचारण्यासाठी जात आहेत. मात्र या दोन्ही विभागाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा अनुभव संबंधित शेतकऱ्यांना येत आहे.
एकदा आयटी रिटर्न भरणाऱ्यांची माहिती नाही..
एकदा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही पीएम किसानचा लाभ देण्याचा आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. यासाठी पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती जिल्हा महसूल प्रशासनास सहजपणे उपलब्ध होऊ शकते. मात्र त्यांच्याकडून पात्र शेतकऱ्यांची संख्या उपलब्ध नाही. त्यामुळे या आदेशाचा फज्जा उडाल्याचे चित्र सध्या तरीही प्रशासकीय पातळीवर दिसत आहे.
पात्र असूनही वंचित ..पंतप्रधानांच्या नावे असलेल्या योजनेतील लाभार्थींना लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी, लाभासाठीचे अडथळे सोडविण्याची जबाबदारी कोणीही घेत नाहीत. यामुळे अनेक पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहेत.