लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हंटस् बँकेने १०४ व्या वर्षात पदार्पण केले असून, संचालक मंडळाने काटकसरीचा कारभार करीत अहवाल सालात २ कोटी १ लाख रुपयाचा नफा मिळविल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष रवींद्र पंदारे यांनी दिली.
राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हंटस् बँकेची १०३ वी वार्षिक सभा संस्था कार्यालयात ऑनलाइन झाली, त्यावेळी ते बोलत होते. पंदारे म्हणाले, पारदर्शक कारभाराद्वारे बँकेने ठेवीचा चढता आलेख कायम ठेवला असून, सलग दहा वर्षे ० टक्के एनपीए ठेवण्यात यश आले आहे. रिझर्व्ह बँकेने बँकांना लाभांश वाटप करण्यास परवानगी दिलेली नाही. त्यांची परवानगी मिळताच ९ टक्क्यांप्रमाणे लाभांश दिला जाईल.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी सर्व संचालक उपस्थित हाेते. उपाध्यक्ष विलास कुरणे यांनी आभार मानले.
फोटो ओळी : राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हंटस् बँकेची १०३ वी वार्षिक सभा शनिवारी संस्था कार्यालयात ऑनलाइन झाली. यावेळी अध्यक्ष रवींद्र पंदारे यांनी मार्गदर्शन केले. (फोटो-२७०३२०२१-कोल-गव्हर्नमेंट बँक)
सत्ताधाऱ्यांनी ऑनलाइनच्या आडून सभा गुंडाळली
समांतर सभेत विरोधकांचा आरोप : चुकीचा कारभार झाकण्यासाठीच उठाठेव
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हंटस् बँकेची ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा गुंडाळल्याचा आरोप विरोधी गटाने समांतर सभेत केला. पाच वर्षांत केलेला चुकीचा कारभार झाकण्यासाठीच ही उठाठेव सुरू असल्याचा आरोप पंढरीनाथ मांडरे यांनी समांतर सभेत केला.
बँकेच्या ५६३ सभासदांनी ऑनलाइन सभेसाठी नोंदणी केली होती. मात्र, सत्तारूढ गटाने आपल्या समर्थकांना कनेक्ट करून घेतले. आम्ही प्रश्न विचारण्याच्या अगोदरच सभा गुंडाळली. गेल्या पाच वर्षांत सत्ताधारी गटाने अनेक चुकीचे निर्णय घेतल्याने बँकेचे नुकसान झाले. आज जरी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी सभासदांच्या न्यायालयात जाऊन न्याय मागू, असे पंढरीनाथ मांडरे यांनी सांगितले. यावेळी विद्यमान संचालक बाळासाहेब घुणकीकर, जयदीप कांबळे, संजय सुतार, राजेंद्र शंकरराव पाटील, प्रकाश पाटील, नेहा कापरे, शंकरराव राऊत, मंदाकिनी साखरे, गौतम माने, महादेव लांडगे, राजन पवार, महेश चौधरी, गणेश पारसे, सुनील कोळी आदी उपस्थित होते.
संचालकांच्या ओळखीतच गेली २२ मिनिटे
पाच वर्षे काम करणाऱ्या संचालकांची ओळख करून देण्यासाठी सर्वसाधारण सभा नसते. मात्र, एकूण सभा चालली २२ मिनिटे. त्यातील बहुतांशी वेळ हा संचालकांच्या ओळखीत गेल्याचा आरोप संचालक बाळासाहेब घुणकीकर यांनी केला.