कोल्हापूर : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत कोल्हापूर शहरात नागरी दळणवळण साधनांचा विकास याअंतर्गत रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांकरिता २०३.८२ कोटींच्या निधीस मंगळवारी मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे होते.
बैठकीस पालकमंत्री सतेज पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपस्थित होते, तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दूरभाष्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत नागरी दळणवळण साधनांचा विकास याअंतर्गत कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील रस्ते, गटर, भुयारी मार्ग व फुटपाथ करण्याच्या कामांचा १७८ कोटींचा प्रस्ताव २०१९ मध्ये नगरविकास विभागाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर मंगळवारच्या बैठकीत चर्चा झाली. प्रस्तावानुसार निधी देण्यास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली. परंतु, हा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीचा असल्याने नवीन ‘डीएसआर’प्रमाणे होणाऱ्या २०३ कोटी ८२ लाखांचे प्रस्ताव दोन टप्प्यांत तातडीने सादर करा, अशी सूचना मंत्री शिंदे यांनी यावेळी केली. प्राधान्यक्रमाने केल्या जाणाऱ्या कामांना टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महापालिकेची निवडणूक तोंडावर असल्याने प्रस्तावास मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. या विकासकामात पंचवीस टक्के रक्कम महापालिकेला भरावी लागणार आहे, परंतु पालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे पंचवीस टक्क्यांऐवजी दहा टक्के करावी, अशी विनंती पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.
प्राधान्यक्रमाने करायच्या कामांचे दोन स्वतंत्र प्रस्ताव नवीन दरसूचीप्रमाणे येत्या काही दिवसांत पाठवावे लागणार आहेत. तसेच महानगरपालिकेने जुन्या योजनेतील कामांचा निधी खर्च झाला किंवा नाही, कामे पूर्ण झाली किंवा नाहीत याचा अहवाल द्यावा लागणार आहे. त्यामुळे अपूर्ण कामे एक महिन्यात पूर्ण केली जातील, असे आमदार जाधव यांनी सांगितले.
- क्षीरसागर, जाधव, पाटील यांचा पाठपुरावा -
कोल्हापूर शहरातील विकासकामांच्या या प्रस्तावाचा नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून सतत पाठपुरावा केला. या सर्वांनी मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांना प्रस्ताव, निवेदने देऊन सतत निधीबाबात आठवण करून दिली. तिघांच्या प्रयत्नांना मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांचे पाठबळ मिळाले.
(फोटो देत आहे.)