कोल्हापूर : कुष्ठरोग हा पूर्णत: बरा होणारा आजार असला आणि त्याच्या उच्चाटनासाठी प्रत्येक वर्षी विशेष मोहिमा घेतल्या तरी कोल्हापूर जिल्ह्यात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रकार काही थांबत नाहीत. एप्रिल २०२३ पासून आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात २०७ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्याच्या तुलनेत नवीन रुग्णांचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी चिंता करण्यासारखे आहे.कुष्ठरोग म्हटले की, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक घाबरतात. त्याची वाच्यता कोठे करीत नाहीत. अंगावर न खाजणारा, न दुखणारा, बधिरपणा असलेला फिकट लालसर रंगाचा चट्टा दिसून येतो; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. एक महिना ते पाच महिने या चट्ट्याचा काहीच त्रास होत नाही; परंतु नंतर जेव्हा विकृती दिसून यायला लागते, तेव्हा संबंधित रुग्ण डॉक्टरांकडे जातात. अंगावर चट्टे स्पष्टपणे दिसत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्याने हा आजार बळावत जात असल्याचे दिसून येते.सांसर्गिक व असंसर्गिक असे दोन प्रकारचे कुष्ठरुग्ण आढळून येत असतात. कोल्हापूर जिल्ह्यात सांसर्गिक रुग्णांचे प्रमाण ५७ टक्के, तर असंसर्गिक रुग्णांचे प्रमाण ४३ टक्के इतके असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेद्वारे प्रत्येक वर्षी २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत कुष्ठरोग निर्मूलन पंधरावडा पाळला जातो. या कालावधीत शहरी भागात ३० टक्के, तर ग्रामीण भागात १०० टक्के लोकसंख्येचे सर्वेक्षण केले जाते. शहरी भागातील काही भाग यासाठी निश्चित केले जातात. यावर्षी सर्वेक्षणात ६८ नवीन रुग्ण सापडले.
चिंताजनक! कोल्हापुरात आढळले नवीन २०७ कुष्ठरुग्ण
By भारत चव्हाण | Published: February 07, 2024 6:41 PM