कोल्हापूर : कोल्हापूर शहरात अद्यापही २१ इमारती धोकादायक अवस्थेत असून, त्या उतरवून घेण्यासंदर्भात संबंधित मिळकत मालकांना महानगरपालिका प्रशासनाकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षभरात मात्र ३३ इमारती उतरवून घेण्यात आल्या असून ३६ इमारतींची दुरुस्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.महाडच्या घटनेमुळे धोकादायक इमारतींचा विषय पुन्हा देशभर चर्चेत आला आहे.त्या पार्श्वभूमीवर लोकमतने कोल्हापुरातील अशा इमारतींची माहिती घेतली. कोल्हापूर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न प्रत्येक पावसाळ्यापूर्वी चर्चेत येत असतो.
साधारणपणे एप्रिल व मे महिन्यांत अशा धोकादायक इमारती उतरवून घेण्याबाबत पालिका प्रशासनाकडून नोटीस देण्यात येते. शहरात ९० धोकादायक इमारती होत्या. त्या सर्व मिळकत मालकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. गेल्या वर्षभरात त्यापैकी ३३ धोकादायक इमारती उतरवून घेण्यात आल्या आहेत; तर ३६ इमारती दुरुस्त करून घेण्यास भाग पाडले आहे.
आता फक्त २१ इमारती या धोकादायक असून त्यासंबंधीचे वाद न्यायालयात प्रलंबित आहेत. या इमारत मालकांना तसेच तेथे वास्तव्यास असणाऱ्या सर्व कुळांना नोटीस देण्यात आली आहे. तसेच त्याबाबत जाहीर प्रकटनही करण्यात आले आहे.