सरवडे : राधानगरी तालुक्यातील कासारपुतळे येथील युवक प्रशांत चव्हाण यांचा अपघात झाला. तो २१ दिवस मृत्यूशी झुंज देत होता. आज त्याची प्राणज्योत मालवली आणि अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. एकुलत्या एक हरहुन्नरी युवकाच्या निधनाने सारा गाव हळहळला.
प्रशांत बळवंत चव्हाण यांचे वडील सेवानिवृत्त पोलीस तर सरवडे येथील मामाही पोलीस व शिक्षक, चांगला सुशिक्षित व दांडगा मित्रपरिवार यामुळे आपणही चांगली नोकरी करायची, अशी जिद्द मनात ठेवून असायचा. सन २०११ मध्ये प्रशांत बीएसएफमध्ये भरती झाला. प्रशिक्षण पूर्ण झाले. पण अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असल्याने ते त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. अखेर त्यांने नोकरीचा राजीनामा दिला आणि कोल्हापूर येथे मित्रांसोबत राहत लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. दरम्यान ५ मे रोजी थोडा पाऊस लागून गेला होता. त्यातच तो सायंकाळी ४ च्या सुमारास कळंबा येथे मोटरसायकलसमोर कुत्रे आडवे आले आणि प्रशांत गाडीवरून घसरून पडला. डोक्याला मार लागला. खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ८ मे रोजी त्याच्यावर मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया झाली. हळूहळू प्रकृतीत सुधारणा होत होती. प्रशांत मृत्यूशीच जणू २१ दिवस झुंज देत होता. अखेर आज २६ मे रोजी प्राणज्योत मालवली. आणि या नेहमीच हसतमुख असणारा,आदरयुक्त बोलणारा युवकाच्या निधनाने गाव हळहळला आणि त्याचे अधिकारी होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. प्रशांतचे वय ३० होते आणि तो अविवाहित होता. त्याच्या पश्चात वडील,तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.