इंदुमती गणेश ल्ल कोल्हापूरगणेशोत्सव दोन महिन्यांवर आल्याने पुन्हा एकदा २१ फुटी गणेशमूर्तींचा प्रश्न पुढे आला आहे. वारंवार आवाहन करूनही अद्यापही अनेक मंडळांकडून २१ फुटी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. मात्र, विसर्जन मिरवणूक, विसर्जनावेळी मूर्तीचा होणारा अवमान, पाणी प्रदूषण या सगळ््यांचा विचार करता २१ फुटी मूर्तीचा अट्टहास असेलच, तर फायबरच्या मूर्तीचा पर्याय पुढे आला आहे. कोल्हापुरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आपल्या मंडळाची गणेशमूर्ती सगळ््यात वेगळी किंवा उंच असावी यासाठी मंडळांमध्ये चढाओढ सुरू असते. त्याच चढाओढीतून २१ फुटी गणेशमूर्ती बसवण्यास सुरुवात झाली. त्यात शिवाजी चौकातील दोन तरुण मंडळे, विश्वशांती तरुण मंडळ, पूलगल्ली तालीम मंडळ अशा मोठ्या मंडळांचा समावेश आहे. त्यामुळे मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा मुद्दा उपस्थित झाला. मिरवणूक मार्गांची होणारी अडचण आणि विसर्जन करताना मूर्तीच्या होणाऱ्या अवमानाचा प्रश्न पुढे आला. गेल्या चार-पाच वर्षांपासून झालेली जनजागृती व प्रबोधनामुळे गतवर्षी २१ फुटी गणेशमूर्तीची संख्या ९ वर आली होती. ज्या मंडळांना २१ फुटी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करायची आहे, त्यांनी फायबरच्या मूर्तीचा पर्याय अवलंबावा, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे. शाहूनगर मित्र मंडळाच्यावतीने दरवर्षी एकच फायबरची गणेशमूर्ती बसवली जाते. त्यामुळे विसर्जन आणि प्रदूषणाचा प्रश्नच निर्माण होत नाही.मंडळांनी २१ फुटी गणेशमूर्तीचा आग्रह धरू नये, एक पेठ एक गणपती उपक्रम राबवूया, मूर्ती लहान बसवून तलाव स्वच्छ ठेवूया तसेच डॉल्बीविरहित गणेशोत्सव साजरा करूया यासाठीचे प्रबोधन सुरू केले आहे. त्यासाठी शहरातील सर्व मंडळे व तालीम संस्थांची भेट घेत असून, मंडळांकडून सकारात्मक प्रतिसाद आहे. - दीपक पोलादे (सामाजिक कार्यकर्ते)पहिला २१ फुटी गणपती १९७५ साली कोल्हापुरात २१ फुटी गणेशमूर्तीची सुरुवात १९७५ साली झाली. जुना बुधवार तालमीने पहिल्यांदा मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यानंतर हळूहळू शहरातील विविध तालीम व मंडळांनी मूर्ती प्रतिष्ठापित करण्यास सुरुवात केली. कोल्हापुरात नोंदणीकृत झालेली ४ हजारांवर गणेश मंडळे आहेत. त्यापैकी किमान १३ गणेश मंडळांच्यावतीने २१ फूट उंचीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. गतवर्षी ही संख्या ९ वर आली होती. न्यायालयाचे निर्देश न्यायालयाने गणेशमूर्ती शाडूची असावी, असा निर्णय तीन वर्षांपूर्वी दिला होता. त्यात मूर्ती जास्तीत जास्त किती उंचीची असावी, याचे स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत. मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाची सोय त्या त्या मंडळांनी करावी, असे निर्देशात मांडण्यात आले आहे. त्यासाठी कोणत्याही जलाशयाचा वापर करता येणार नाही. कोल्हापुरात महापालिकेच्यावतीने इराणी खण येथे २१ फुटी मूर्तींच्या विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. मात्र, इराणी खणीची क्षमता आणि मूर्तींची संख्या यांचे प्रमाण व्यस्त स्वरुपात आहे. खणीत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.
२१ फुटी गणेशमूर्तीला फायबर मूर्तीचा पर्याय
By admin | Published: July 17, 2016 12:50 AM