संदीप आडनाईक
कोल्हापूर : सिंधुदुर्गातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ‘वेंगुर्ला रॉक्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या द्वीपसमूहातील चार गुहांमध्ये २१ अपृष्ठवंशीयांची आणि पाच पृष्ठवंशीय सजीव आढळले आहेत. सलिम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अँड नॅचरल हिस्टरी (सॅकॉन) या संस्थेने मॅनग्रोव्ह अँड मरिन बायोडायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र या संस्थेसोबतच्या अभ्यासात या गुहांत ४,७०० पक्ष्यांसह पाकोळ्यांची घरटी असल्याचा अहवाल दिला आहे.
मॅनग्रोव्ह फाउंडेशनने या वेंगुर्ला रॉक्सचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या संस्थेने या बेटांवरील जैवविविधतेचा जानेवारी ते जून २०२० या कालावधीत सॅकॉन या संस्थेसाेबत अभ्यास केला. त्यांचे संशोधक शिरीष मांची, गोल्डिन क्वाड्रोस आणि धनुषा कावळकर्ते यांनी या ‘वेंगुर्ला रॉक्स’ प्रदेशातील चार गुहा शोधल्या, पैकी बर्न्ट आयलँडवरील पाखोली ढोल नावाच्या एकाच गुहेपर्यंत ते पोहोचले. इतर तीन गुहा अद्याप अस्पर्शित आहेत.
समुद्राची पातळी वाढल्याने परिसंस्थेला धोका
सॅकोनच्या अभ्यासात कोळी, भुंगेरा, खेकडे, पतंग, फुलपाखरे, चतुर, रातकिडा (क्रिकेट), ख्रिसमस ट्री वर्म्स, सिल्व्हरफिश आणि बरनॅकल्स यासारख्या २१ अपृष्ठवंशीयांच्या प्रजातींचा पाकोळी ढोलमध्ये नोंद झाली आहे. यात पाकोळी, कबुतरे आणि मार्टिन हे तीन पक्षी, सस्तन प्राणी (घूस) आणि सरपटणारा प्राणी (छोटी पाल) असे पाच पृष्ठवंशीय सजीवही आढळले. संशोधकांनी वातावरण बदल आणि समुद्राची पातळी वाढल्यामुळे या गुहेच्या नाजूक परिसंस्थेला आणि त्यांच्या जैवविविधतेला धोका असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे.
द्वीपसमूहात एकूण २० छोटी बेटे
या द्वीपसमूहात एकूण २० छोटी बेटे आहेत. ‘वेंगुर्ला रॉक्स’मध्ये न्यू लाइटहाऊस बेट, ओल्ड लाइटहाऊस बेट आणि बर्न्ट आयलँड या तीन मोठ्या बेटांशिवाय इतर नऊ छोटी बेटे आहेत आणि आठ पाण्याखालचे खडक मिळाले आहेत. एका गुहेत संशोधकांना ४,७०० पक्ष्यांची घरटी आणि भारतीय पाकोळ्यांची बरीच घरटी आढळली आहेत. सॅकॉनने या गुहांचे द्विमिती आणि त्रिमिती नकाशेही विकसित केले आहेत.
‘वेंगुर्ला रॉक्स’ द्वीपसमूहाच्या गुहेतील प्राणीसृष्टी समजून घेण्यासाठी हा अभ्यास केला होता. निष्कर्षांच्या आधारे कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान या ठिकाणाच्या संरक्षणाच्या शक्यतांची पडताळणी आणि जनजागृती करत आहे. - विरेंद्र तिवारी, अतिरिक्त प्रधान, मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष तथा कार्यकारी संचालक, मॅनग्रोव्ह फाउंडेशन