कोल्हापूर : जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील २१ गावांमध्ये आणि १00 हून अधिक वाड्यावस्त्यांवर अजूनही स्मशानशेड नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत; मात्र यातील अनेक गावांना स्मशान शेडसाठी निधी मंजूर झाला होता; परंतु गेली काही वर्षे प्रयत्न करूनही सार्वजनिक जागा उपलब्ध होत नसल्याने अनेक गावांचा निधी परत गेला आहे ही वस्तुस्थिती आहे.जिल्ह्यातील १0२७ ग्रामपंचायतींपैकी २१ गावे आणि १00 वाड्यावस्त्या या सुविधेपासून वंचित आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेने गेल्या सहा वर्षांमध्ये प्राधान्याने स्मशानभूमीतील शेड, रस्ते, संरक्षक भिंती यावर मोठा खर्च केला आहे. या २१ गावांमधील स्मशानभूमीसाठीही निधी मंजूर करण्यात आला होता; मात्र या ठिकाणी सार्वजनिक जागाच उपलब्ध नसल्याने, जी जागा आहे ती सर्वांच्या वहिवाटीसाठी सुलभ नसल्याने या गावांमध्ये अजूनही स्मशानभूमीचे काम मार्गी लावता आलेले नाही.
प्रकाश आबिटकर यांनी मांडला अधिवेशनात मुद्दाआमदार प्रकाश आबिटकर यांनी मंगळवारी नागपूर येथे अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला. दरडोई उत्पन्नामध्ये अग्रेसर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात या गावांमध्ये आणि वाड्यावस्त्यांवर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागणे दुर्देवी असल्याचे सांगत तारांकित प्रश्नाद्वारे त्यांनी हा प्रश्न मांडला.प्राधान्याने निधी देऊ - पंकजा मुंडेआमदार आबिटकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी गेल्या सहा वर्षांमध्ये स्मशानभूमींसाठी मोठा निधी दिला आहे; मात्र जागांअभावी आणि तांत्रिक कारणांमुळे काही ठिकाणी हे काम झालेले नाही. येत्या दोन वर्षांत उर्वरित गावांसाठी निधी दिला जाईल, असे आश्वासन दिले.
हे करता येईलकोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक कामासाठी पदरमोड करण्याची परंपरा आहे. गावच्या शाळेसाठी, मंदिरासाठी तसेच स्मशानभूमीसाठीही अनेक दानशूर ग्रामस्थांनी आपल्या जागा दिल्या आहेत. याचाच कि त्ता गिरवत या २१ गावांमधील तसेच १00 वाड्यावस्त्यांवरील दानशूर नागरिकांनी गावाशेजारी सर्वांना सोयीची असणारी केवळ २ गुंठे जागा जर दिली तर गावचा एक अतिशय कळीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
स्मशानभूमीसाठी अशी जागा देणाऱ्या दानशूर ग्रामस्थांचा जिल्हा परिषदेने विशेष गौरव करण्याची गरज आहे. अगदीच अडचण असेल तर ग्रामपंचायतीने दानशूर नागरिकांच्या मदतीतून अशी जागा खरेदी करण्यासाठीही पुढाकार घेण्याची गरज आहे.