जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज, शनिवारी २१ वी ऊस परिषद येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होत आहे. गत हंगामातील एफआरपी अधिक दोनशे रुपये, कारखान्यांची काटामारी आणि यावर्षी तुटणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी व ज्यादाचा दर या तीन मुद्द्यांवर आंदोलनाची दिशा या ऊस परिषदेत ठरणार आहे. त्यामुळे या परिषदेकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर साखर कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे. ही परिषद ऐतिहासिक होण्यासाठी स्वाभिमानीने नियोजन केले असून, मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून महापूर, कोरोना, अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षी एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी स्वाभिमानीने केली होती. एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी राजू शेट्टी यांनी ‘जागर एफआरपीचा, संघर्ष ऊस दराचा’ यातून दौरे केले आहेत. ऊस परिषदेची जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे या परिषदेकडे राज्यासह सीमाभागातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, शुक्रवारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के आणि स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी ऊस परिषद ठिकाणाची पाहणी केली. शिवाय पार्किंग, बैठक व वाहतूक नियोजनही निश्चित करण्यात आले. या परिषदेत राजू शेट्टी यांच्यासह प्रा. जालंदर पाटील, संदीप जगताप, सावकर मादनाईक, प्रकाश पोपळ, सतीश काकडे, पृथ्वीराज जाचक आदी मार्गदर्शन करणार आहेत. ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र, दसरा चौक, मादनाईक पेट्रोल पंप, झेले चित्रमंदिर याठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे.