कोल्हापूर : गेल्या पंधरवड्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली असली तरी यातून बरे होणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. १ एप्रिलपासून २२ एप्रिलपर्यंत ३३२३ रुग्ण कोरोनातून होऊन घरी गेले आहेत. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर लवकर डॉक्टरांना तब्येत दाखविल्यास असे रुग्ण तातडीने बरे होत असल्याने रोज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यामध्येच कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली. १ एप्रिल रोजी गेल्या वर्षीपासूनची कोरोनाची एकूण संख्या आकडेवारी पाहता ही ५२१८२ इतकी होती, तर २२ एप्रिल रोजी हाच आकडा ६० हजार २२१ वर पोहोचला. या २२ दिवसांमध्ये ८०३९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
ज्या पद्धतीने कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्याच पद्धतीने मोठ्या संख्येने रुग्णांना डिस्चार्जही मिळत आहे. १ एप्रिल ते १० एप्रिल या काळात ५० ते ८९ च्या दरम्यान रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. ११ एप्रिल ते १५ एप्रिलदरम्यान १०० हून अधिक, तर १६ एप्रिलपासून २०० हून अधिक रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येऊ लागला. गेल्या काही दिवसांतील सर्वाधिक ३४५ रुग्णांना डिस्चार्ज हा २१ एप्रिल रोजी देण्यात आला आहे.
चौकट
तारीख डिस्चार्ज रुग्ण
१५ एप्रिल १०३
१६ एप्रिल २१९
१७ एप्रिल २७६
१८ एप्रिल १५२
१९ एप्रिल २४३
२० एप्रिल २८९
२१ एप्रिल ३४५
२२ एप्रिल २८२
कोट
मी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मला कालपासून ताप होता. सकाळी जिल्हा परिषदेत अँटिजन चाचणी करून घेतली. माझा अहवाल निगेटिव्ह आला. यानंतर मी आजच दुपारी स्वॅब दिला. त्याचाही अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे मनातील शंका दूर झाली. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची काही लक्षणे दिसली तर तातडीने डॉक्टरांकडून तपासून घ्यावे.
डॉ. योगेश साळे
जिल्हा आरोग्य अधिकारी