राजाराम लोंढे / कोल्हापूरजिल्हा बॅँकेच्या माजी संचालकांची कलम ८८ अन्वये चौकशी पूर्ण होऊन तिचा अहवाल प्राधिकृत अधिकारी व पुणे विभागीय साखर सहसंचालक सचिन रावल यांनी शुक्रवारी, दि. २३ विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांच्याकडे सादर केला. २३२ पानी अहवालात ४५ माजी संचालक व एका कार्यकारी संचालकांवर १४७ कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित केली आहे. २२ माजी संचालकांवर प्रत्येकी पाच कोटी रुपयांची जबाबदारी असून, त्याशिवाय २००२ पासून त्यांच्याकडून व्याजही वसूल होणार आहे. बॅँकेच्या २००२-०३ ते २००६-०७ च्या शासकीय लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार वाटप केलेले नियमबाह्ण कर्ज व २००६-०७ कालावधीमध्ये बॅँकेने नियमबाह्ण वाटप केलेला लाभांश याच्या चौकशीसाठी २००७ ला तत्कालीन जिल्हा उपनिबंधक कै. संजय रानगे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. तद्नंतर नियुक्त झालेले धनंजय डोइेफोडे यांनी २७ फेबु्रवारी २००९ रोजी ७२ (२) अनुसार माजी संचालकांना नोटिसा बजावल्या. मार्च २०१० मध्ये संबंधितांवर ७२ (३) अनुसार दोषारोप पत्र बजाविले. डोईफोडे यांची बदली झाल्यानंतर आॅगस्ट २०१० मध्ये सचिन रावल यांनी पुढील कारवाई सुरू केली. रावल यांचे गेले साडेचार वर्षे चौकशीचे काम सुरू होते. त्यांनी दाखल केलेल्या अहवालात संचालकांच्या कामकाजावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ४५ माजी संचालक व एका कार्यकारी संचालकांवर जबाबदारी निश्चित केली असून, १ एप्रिल २००२ पासून सदर आर्थिक नुकसानीची वसुली होईपर्यंतच्या कालावधीची १३ टक्के व्याजदराने होणारी रक्कम संबंधितांकडून वसूल करून घेण्याचे आदेशही प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
२२ माजी संचालकांवर पाच कोटींची जबाबदारी
By admin | Published: January 26, 2015 12:20 AM