शिरवळ : अविश्वास ठरावामुळे सरपंचपदावरून काढणे व गावातून हाकलून लावण्यास पुढाकार घेतल्याच्या कारणावरून शिंदेवाडी, ता. खंडाळा येथे एसटीच्या वाहकाचा शस्त्राने खून करण्यात आला होता. यातील बाळू ऊर्फ बाळासाहेब गेनबा तुंगतकर (वय ४६, रा. बारे बुद्रुक, ता. भोर) या फरार आरोपीला तब्बल २२ वर्षांनी अटक करण्यात शिरवळ आणि खंडाळा पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे जिल्ह्यातील बारे बुद्रुक (ता. भोर) येथील राजाराम नारायण तुंगतकर सरपंच होता. त्याच्या पूर्वाश्रमीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे दहशत माजवत गुंडगिरीला प्रोत्साहन देत असल्याने त्याच्या सरपंचपदावर सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव आणलेला. त्यानुसार अविश्वास प्रस्ताव मंजूर करत राजाराम तुंगतकरला व त्याच्या साथीदारांना ग्रामस्थांनी गावाच्या बाहेर हाकलून लावले होते. दरम्यान, याप्रकरणी एसटीमध्ये वाहक असलेले भीमाजी भिकोबा मळेकर (वय ४५, रा. बारे बुद्रुक) यांनी मोठा पुढाकार घेतला होता. त्यामुळे राजाराम तुंगतकर हा भीमाजी मळेकर यांच्यावर चिडून होता.
दरम्यान, २ आॅक्टोबर १९९७ रोजी भोर आगाराच्या नीरा-भोर या एसटीवर वाहक म्हणून भीमाजी मळेकर हे होते. तर चालक म्हणून बारे बुद्रुक येथीलच पांडुरंग राऊ दानवले होते. त्यावेळी नीरा बाजूकडून भोरकडे जात असताना शिंदेवाडी गावच्या हद्दीमध्ये एसटी सायंकाळी आली. तेव्हा वाहक भीमाजी मळेकर यांचा शस्त्राने निर्घृणपणे खून केला. पांडुरंग दानवले यांच्या फिर्यादीवरून शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी राजाराम तुंगतकर याच्यासह आठजणांना अटक केली होती. दरम्यान, खून केल्यापासून बाळू तुंगतकर फरार होता.
सध्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या आदेशानुसार फरार आरोपींचा शोध घेत असताना शिरवळचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती. फरार आरोपी बाळू तुंगतकर हा बारे बुद्रुकला वास्तव्यास आहे. त्यानुसार वेताळ यांच्या नेतृत्वाखाली खंडाळाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे, यांच्या संयुक्त पथकाने बारे येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सापळा रचला. यादरम्यान, बाळू तुंगतकर याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली. शिरवळ पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया करत सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या ताब्यात दिले.
आणखी दोन आरोपी फरार...
वाहकाच्या खूनप्रकरणी २२ वर्षांपासून फरार असलेल्या बाळू तुंगतकार याला पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर याच प्रकरणात आणखी दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींचे घर बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधित आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊ, असा विश्वास पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, तपास अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. ं