कोल्हापूर : महावितरणच्या गो-ग्रीन योजनेत सहभागी होऊन वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत पश्चिम महाराष्ट्रातील आतापर्यंत १ लाख ८४ हजार २२० वीजग्राहकांनी केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडला. या ग्राहकांची वर्षभरात तब्बल २ कोटी २१ लाख रुपयांची बचत झाल्याचा दावा महावितरणने केला आहे. तर या योजनेत पुणे परिमंडलातील १ लाख २३ हजार वीजग्राहकांनी राज्यात सर्वाधिक संख्येने गो-ग्रीन योजनेत सहभाग घेतला आहे.वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी महावितरणचे मोबाइल ॲप किंवा www.mahadiscom.in संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. ‘गो-ग्रीन’ योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांची वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत.अशी झाली ग्राहकांची बचत :परिमंडल - ग्राहक - बचतपुणे - १,२३,४०३ - १.४८ कोटीबारामती - ३३,७३८ - ४०.४८ लाखकोल्हापूर - १६,६१५ - ३२.४९ लाख
काय आहे ‘गो-ग्रीन’ योजना?महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ई-मेल व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारेदेखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा त्वरित लाभ घेता येणे शक्य झाले आहे.
पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी ‘गो-ग्रीन’ योजना ही काळाची गरज बनली असून, वीजबिलाची सॉफ्ट कॉपी जतन करून ज्यावेळी आवश्यकता असेल तेव्हा वीजबिलाची कागदी प्रिंट काढता येते. त्यामुळे कागदी मासिक बिलाचा वापर बंद करून गो-ग्रीन योजनेत वीजग्राहकांनी सहभागी व्हावे. - अंकुश नाळे (संचालक, पुणे प्रादेशिक महावितरण)