विश्वास पाटील )
कोल्हापूर : हुपरी (ता. हातकणंगले) येथील ठकसेन राजेंद्र भीमराव नेर्लेकर याने निमित्त सागर महाराज यांच्याकडून बँकेच्या माध्यमातून जे पैसे घेतले ती रक्कम २३ कोटी रुपये निघाली. पण ही रक्कम नेर्लेकर याला रात्रीपर्यंत मान्य झाली नाही, त्यामुळे चर्चा अर्धवट राहिली. परिणामी निमित्त सागर महाराज यांनी नेर्लेकर याच्या हुपरीतील शिवाजीनगर परिसरातील बंगल्यासमोर सोमवारपासून सुरू केलेले उपोषण आज बुधवारी तिसऱ्यादिवशीही सुरूच राहिले. विविध उद्योगाची उभारणी करून मोठा लाभ मिळवून देण्याच्या आमिषाने झालेल्या सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी मंगळवारी दिवसभर अनेक घडामोडी घडल्या. दक्षिण भारत जैन सभेचे महामंत्री डी ए पाटील, कर्मवीर मल्टिस्टेटचे अध्यक्ष अरविंद मजलेकर, रवींद्र देशमाने, महावीर गाट आदींनी याप्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. या सर्वांनी उपोषणस्थळी येऊन महाराजांकडून सर्व प्रकार समजून घेतला. त्यानंतर सोमवारपासून ज्याच्या दारात या घडामोडी घडत आहेत, तो नेर्लेकर मंगळवारी घरी परतला. जैन समाजाच्या नेत्यांनी बंद दाराआड त्याच्यासोबत चर्चा केली व चर्चेतील माहिती महाराजांना दिली. परंतु त्यातून तोडगा निघाला नाही.
विविध प्रांतातील श्रावकांनी आपल्या सांगण्यावरून रक्कम गुंतवणूक केली असल्याने रक्कम परत न मिळाल्यास आपण कोणत्याही क्षणी पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याच्या निर्णयावर महाराज ठाम आहेत. विविध प्रकारचे उद्योग उभारणी करणे तसेच विविध प्रकारच्या करन्सीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळवून देणे अशा प्रकारची आमिषे दाखवून या नेर्लेकर याने कोट्यवधी रुपयांना फसविल्याचा आरोप करत निमित्त सागर महाराजांनी सोमवारपासून महाठकसेनच्या दारातच उपोषण सुरू केले. ही माहिती समजताच वीर सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्रीपर्यंत उपोषणस्थळी थांबून महाराजांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पण महाराजांनी त्या सर्वांना घरी जाण्याचे आवाहन करून थंडगार वारा व बोचऱ्या थंडीत उघड्यावरच संपूर्ण रात्र घालविली.
लोकमतच्या वृत्ताने खळबळ
स्वत: निमित्त सागर महाराज हेच या फसवणूक प्रकरणात उपोषणास बसल्याने लोकमतने त्याचे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध केले. त्याबद्दल समाजातून चांगली प्रतिक्रिया उमटली. अशा फसवणूक करणाऱ्यांना अनेक कंपन्यांचा पर्दाफाश फक्त लोकमतनेच केल्याच्या भावना वाचकांनी व्यक्त केल्या. नेर्लेकर याने सामान्य लोकांनाच नव्हे तर साधूंनाही सोडले नसल्याच्या प्रतिक्रिया जास्त होत्या.
पोलिसांचे काम बंदोबस्तापुरतेच..
पोलिसांच्या पातळीवर मात्र दिवसभर सामसूम राहिली त्यांनी कोणतीही चौकशी सुरू केलेली नाही. फक्त महाराज उपोषणाला बसलेत तिथेच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निमित्त सागर महाराज यांनीही अजून पोलिसांकडे फसवणुकीची रीतसर तक्रार दिलेली नाही.