शरीरात रक्तवाहिन्या जितक्या महत्त्वाच्या असतात, तितकेच देशाच्या आर्थिक विकासात महामार्ग महत्त्वाचे असतात. महामार्गांमुळे दळणवळण सुलभ आणि गतिमान होऊन व्यापार, उद्योग, व्यवसाय, पर्यटनाला चालना मिळते. जिल्ह्यातून जाणा-या पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाने निश्चितच विकासाला गती दिली. मात्र, अशास्त्रीय बांधकाम, धोकादायक वळणे, सेवा रस्त्यांचा अभाव, स्थानिकांची वर्दळ आणि रेंगाळलेले विस्तारीकरण अशा अनेक कारणांमुळे कागल ते शेंद्री (सातारा) दरम्यानचा महामार्ग नेहमीच अडथळ्यांचा ठरला आहे. शेकडो बळी घेणा-या महामार्गावरील वाहतूक विनाअपघात आणि गतिमान करायची असेल तर अनेक सुधारणांची गरज आहे. त्यामुळेच महामार्गाची सध्य:स्थिती आणि अपेक्षांचा लेखाजोखा मांडणारी ही विशेष वृत्तमालिका... महामार्ग विकासाचा की मृत्यूचा?
उद्धव गोडसेकोल्हापूर : जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणा-या पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाने कागल ते पेठ नाक्यादरम्यान गेल्या दोन वर्षात ३२० अपघातांमध्ये २३४ बळी घेतले. अपघातांमुळे शेकडो संसार उद्ध्वस्त झाले, तर आठशेहून अधिक प्रवासी जखमी होऊन त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. अपघाती बळी रोखण्यासाठी महामार्गाच्या रुंदीकरणासह स्थानिकांसाठी स्वतंत्र सेवामार्गांची गरज आहे. सहापदरीकरणाच्या कामात आवश्यक सुधारणा व्हायलाच हव्यात, असा आग्रह स्थानिकांनी धरला आहे.
देशातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांपैकी एक म्हणजे पुणे-बेंगळुरू महामार्ग. सुवर्ण चतुष्कोन योजनेंतर्गत २००२ ते २००६ मध्ये या महामार्गाचे चौपदरीकरण झाले. त्यानंतर कालांतराने कागल ते शेंद्री दरम्यानचे १२९ किलोमीटरचे अंतर वगळता संपूर्ण महामार्गाचे सहापदरीकरण झाले. मात्र, वाहनांची प्रचंड वर्दळ असलेला कागल ते शेंद्रीचा टप्पा दुर्लक्षित राहिला. चौपदरीकरणात चुकीच्या पद्धतीने झालेले काम, सेवा रस्त्यांचा अभाव आणि स्थानिक वाहनांच्या वर्दळीमुळे हा मार्ग अपघातांचा महामार्ग बनला. दरवर्षी या मार्गावर केवळ कागल ते पेठ नाक्यादरम्यान सुमारे ३०० अपघात होतात. कागल ते पेठ नाक्यादरम्यान गेल्या दोन वर्षात ३२० अपघात झाले. त्यात २३४ प्रवाशांना जीव गमवावा लागला, तर ८०५ प्रवासी जखमी होऊन आयुष्यभरासाठी जायबंदी झाले. अपघातांमुळे जीवितहानी तर होतेच ; त्यासोबतच वित्तहानीही मोठ्या प्रमाणात होते.
देशाला जोडणारा महामार्गपुणे-बेंगळुरू महामार्ग दोन्ही बाजूंनी विस्तारला असून, त्याने दक्षिण आणि उत्तर भारताला जोडण्याचे काम केले. पुण्यापासून पुढे मुंबई, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाना, दिल्ली या राज्यांना जोडले. तर दक्षिणेत कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांना जोडले. त्यामुळे चेन्नईपासून ते दिल्लीपर्यंत मालाची वाहतूक करणारी वाहने याच मार्गावरून धावतात.
रोज १५ हजार वाहनेलांबच्या पल्ल्याची वाहतूक आणि स्थानिकांची वर्दळ यामुळे या मार्गावरून २४ तासात सरासरी १५ हजार वाहने धावतात. यात दुचाकींपासून ते अवजड वाहनांपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे. सेवा रस्ते नसल्यामुळे सर्व वाहतूक महामार्गावरूनच होते.
सात महिन्यात ५४ अपघातजानेवारी २०२३ पासून कागल ते शेंद्री दरम्यान महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू झाले. रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड कंपनीने जेमतेम सात ते आठ टक्के काम केले. गेल्या सात महिन्यात कागल ते पेठ नाक्यादरम्यान ५४ अपघात घडले. या अपघातांमध्ये २६ बळी गेले, तर ६४ प्रवासी जखमी झाले. महामार्गाचे काम सुरू असताना ठेकेदाराने अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. अडथळ्यांनी व्यापलेल्या आणि वर्दळीच्या मार्गावर काम सुरू असल्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. यात प्रवाशांचे नाहक बळी जाऊ नयेत, यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
ही आहेत अपघातांची कारणे..
- सेवा रस्त्यांचा अभाव
- बेशिस्त वाहतूक
- वाहतुकीचा अतिरिक्त ताण
- स्थानिकांची वर्दळ
- सदोष रस्ता
- महामार्गावरच चुकीचे वाहन पार्किंग
- उड्डाणपूल, बोगद्यांचे चुकीचे नियोजन
असा आहे महामार्गपुणे ते बेंगळुरू अंतर - ८४२ किमीकागल ते शेंद्री अंतर - १२८ किमीकागल ते पेठनाका अंतर - ६२ किमी
संपूर्ण पुणे-बेंगळुरू महामार्गाच्या कामात कागल ते शेंद्रीदरम्यान अनेक त्रुटी राहिल्या होत्या. सातत्याने पाठपुरावा करूनही त्यात सुधारणा झाल्या नाहीत. आता सहापदरीकरणाचे काम करताना त्या त्रुटी दूर व्हाव्यात यासाठी कागल कृती समितीचा प्रयत्न सुरू आहे. - भैय्या माने - अध्यक्ष, कागल कृती समिती
महामार्गावर वाठारपासून कागलपर्यंत वाहन चालवताना अंगावर अक्षरश: काटा येतो. सेवा रस्ते नाहीत, उलट्या दिशेने होणारी वाहतूक, स्थानिक वाहनधारकांची वर्दळ यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. - प्रकाश भोसले - वाहनचालक