कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील अकरा साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या ‘सॉफ्ट लोन’ योजनेतून २३५ कोटी १५ लाख रुपये कर्ज मंजूूर झाले आहे. उर्वरित कारखान्यांच्या प्रस्तावाला येत्या आठ दिवसांत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. गेले तीन-चार महिने एफआरपीप्रमाणे पैसे देण्याचा तिढा निर्माण झाला होता, तो बऱ्यापैकी मार्गी लागल्याने कारखानदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. साखरेचे दर घसरल्याने यंदा कधी नव्हे इतका साखर उद्योग अडचणीत आला. हंगाम संपून सहा महिने उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याने ते हवालदिल झाले आहेत. ऐन सणाच्या तोंडावर गाळप झालेल्या उसाचे पैसे न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. केंद्र सरकारने सहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले; पण त्यातील तांत्रिक अडचणींमुळे त्यात दोन महिने गेले. कोल्हापूर विभागातील ३७ साखर कारखान्यांनी २०१४-१५ या हंगामात गाळप केले. त्यातील ३४ कारखान्यांनीच साखर आयुक्तांकडे केंद्राच्या पॅकेजबाबत प्रस्ताव सादर केले. त्यातील अकरा कारखान्यांना २३५ कोटी कर्ज मंजूर झाले आहे. सर्वाधिक कर्ज ‘दत्त-शिरोळ’ व ‘जवाहर-हुपरी’ या कारखान्यांना प्रत्येकी ३७ कोटींचे कर्ज मंजूर झाले आहे. या कर्जातून ‘एफआरपी’प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देता येणार आहेत. कारखानानिहाय मंजूर कर्ज असे वारणा - २३ कोटी, दत्त (शिरोळ) - ३७ कोटी ६० लाख, शाहू (कागल) - २५ कोटी २ लाख, जवाहर (हुपरी)- ३७ कोटी ९० लाख, डी. वाय. पाटील (वेसरफ) - १२ कोटी ५४ लाख, शरद (नरंदे) - २० कोटी ४० लाख, मंडलिक (हमीदवाडा) - १७ कोटी १० लाख, दालमिया (आसुर्ले-पोर्ले) - १४ कोटी ६ लाख, मोहनराव शिंदे - १५ कोटी ११ लाख, हुतात्मा - २५ कोटी ६० लाख, हेमरस - १७ कोटी ४५ लाख. ‘वारणा’ची ४७ कोटींची मागणी वारणा साखर कारखान्याने ४७ कोटी ११ लाख, तर हुतात्मा, वाळवा यांनी २५ कोटी ६० लाखांचा प्रस्ताव दिला होता; पण त्यांना बँक आॅफ इंडियाकडून अनुक्रमे २३ कोटी व १४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. गायकवाड, महाडिक शुगर्सचे प्रस्तावच नाहीत विभागातील सरसेनापती संताजी घोरपडे, उदयसिंगराव गायकवाड, महाडिक शुगर्स या कारखान्यांनी कर्जाचे प्रस्तावच पाठविलेले नाहीत. यापैकी ‘सरसेनापती’ कारखाना नवीन असल्याने पॅकेजमध्ये बसत नाही.
अकरा साखर कारखान्यांना २३५ कोटींचे ‘सॉफ्ट लोन’
By admin | Published: September 16, 2015 12:59 AM