दीपक जाधव
कोल्हापूर : पोलीस कल्याण निधीअंतर्गत पोलीस प्रशासनाच्या वतीने येथील ताराबाई पार्कातील अलंकार हॉलशेजारी सुरू करण्यात येणारा पेट्रोल पंप अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मंगळवारी सुरू झाला. या पेट्रोलपंपाच्या व्यवसायातून होणारा सर्व नफा पोलीस कल्याण निधीमध्ये जमा होणार आहे. बावड्यापासून खानविलकर पंपापर्यंत मध्ये कुठेच पंप नसल्याने या पंपावर दिवसभर वाहनधारकांची गर्दी राहिली.पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या प्रयत्नातून हा पंप सुरू झाला असून, तो २४ तास सुरू राहणार आहे. शहरातील रात्रंदिवस सुरू राहणारा हा एकमेव पंप आहे. कारण अन्य पंप सुरक्षेच्या कारणांवरून व मद्यपी त्रास देतात म्हणून अकरानंतर बंद करतात; त्यामुळे रात्रीअपरात्री वाहनांमध्ये इंधन घालण्यास लोकांची अडचण होत असे. हा पंप भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने उभारण्यात आला आहे.
या माध्यमातून महिन्याला अंदाजे एक लाख लिटर इंधन विक्री होण्याचा अंदाज आहे. या ठिकाणी तीन शिप्टमध्ये काम चालणार असून, त्यातून १२ व्यक्तींना रोजगार उपलब्ध झाला आहे. मिळणारा सर्व नफा पोलीस कल्याण निधीला देण्यात येणार आहे.
यामार्फत पोलिसांची आर्थिक अडचण सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. खाकी वर्दी परिधान करून जनतेच्या रक्षणासाठी २४ तास कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनासुद्धा कधी कधी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. जनतेसाठी झटणाऱ्या पोलिसांना आर्थिक अडचणी आल्यास मदतीसाठी निधी हवा, या उद्देशाने हा पेट्रोल पंप सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात हा उपक्रम राबवून पोलीस दलास स्वयंपूर्ण बनविण्यावर भर देण्यात येत आहे.
कल्याण निधीला हातभारया पंपावर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांना रोजगार देण्यात आला आहे, पोलिसांसाठी विविध शिबिरे, त्यांच्या पाल्यांसाठी प्रोत्साहन देणे, शालेय साहित्य वाटप या कामांसाठी पोलीस कल्याण निधीचा वापर होतो; त्यासाठी निधी उभा करण्यात या पंपाचा उपयोग होणार आहे.
पोलीस खात्याचाच पंप असल्याने नागरिकांना शुद्ध इंधन उपलब्ध असेल. पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याने आम्ही रात्रंदिवस सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.डॉ. अभिनव देशमुखपोलीस अधीक्षक कोल्हापूर