कोल्हापूर : राज्यात सोलापूर व अहमदनगर विभागातील २४ साखर कारखान्यांची धुराडी पेटली आहेत. या कारखान्यांच्या गळीत हंगामाने गती घेतली नसली तरी आतापर्यंत १५ लाख टन उसाचे गाळप झालेले आहे. कोल्हापूर विभागातील कारखाने गळीत हंगामासाठी सज्ज असले तरी ऊस दराची कोंडी अजून फुटली नसल्याने यांची धुराडी अद्याप थंडच आहेत. साधारणत: १० नोव्हेंबरनंतर येथील बहुतांशी कारखान्यांचा हंगाम गती घेण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस परिषदेत २७०० रुपये पहिल्या उचलीची मागणी केली आहे. साखर कारखान्यांचा उतारा व त्यानुसार शेतकऱ्यांना द्यावी लागणारी एफआरपीची रक्कम पाहिली तर या मागणीच्या जवळपासच आहे. सध्या बाजारपेठेतील साखरेचे दर व राज्य सहकारी बँकेने कारखान्यांना देऊ केलेली उचल पाहता एकरकमी एफआरपी देताना कारखानदारांची दमछाक होणार आहे. दरवर्षी ऊस परिषदेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊसदराचे आंदोलनाचे रणशिंग फुंकते पण यावर्षी तात्पुरते का असेना आंदोलनाचे हत्यार म्यान करून चर्चेसाठी वेळ दिलेली आहे. पण कारखाने सुरू करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कारखानदारांसमोर पेच निर्माण झाला आहे. राज्य व केंद्र सरकारने कारखान्यांना मदतीबाबत तोंडही उघडलेले नाही. अशा परिस्थितीत कारखाने सुरू केले तर कायदेशीर कचाट्यात अडकण्याची भीती कारखानदारांना आहे. त्यामुळे विशेषत: कोल्हापूर विभागातील कारखानदारांनी ‘वेट अॅन्ड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे. पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यांतील सहकारी व खासगी अशा २२ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. अहमदनगर विभागातील एक सहकारी व एक खासगी साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. आठवड्यात या कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत १५ लाख टन उसाचे गाळप झाले. कोल्हापूर विभागातील कारखान्यांचा साखर उतारा जास्त आहे, परिणामी एफआरपीही वाढते. त्यामुळे कारखानदारांनी सध्या तरी थांबण्याचा निर्णय घेतला असून १० नोव्हेंबरनंतर हळूहळू कारखाने सुरू होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या नजरा चिमणीकडे मध्यंतरी तीन दिवसांचा अपवाद वगळता गेले महिनाभर उन्हाचा तडाका सुरू आहे. या काळात पाणी दिले नाही तर वजनाला फटका बसतो. लागणी करून सोळा महिन्यांचा कालावधी गेला तरी अद्याप ऊस तुटत नाही, त्यात कारखानदारही हंगामाबाबत बोलण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा कारखान्यांच्या चिमणीकडे लागल्या आहेत. कोल्हापूर विभागातील साखर कारखान्याकडे अजून ऊसतोडणी मजूर आलेले नाहीत. त्यात राज्य बँकेने जाहीर केलेल्या उचलीमुळे कारखान्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. येत्या पाच-सहा दिवसांत विभागातील तीन-चार कारखाने सुरू होतील. - पी. जी. मेढे (तज्ज्ञ संचालक, छत्रपती राजाराम कारखाना)
२४ साखर कारखान्यांची धुराडी पेटली
By admin | Published: November 05, 2014 12:40 AM