कोल्हापूर : महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलतीच्या पहिल्या दिवशी २३ हजार ९७१ जणींनी अर्ध्या तिकीटात फुल्ल प्रवास केला. त्यातून महामंडळाला ४ लाख ४७ हजार२१४ रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर सर्वाधिक लाभ गडहिंग्लज आगारातून ३ हजार ६०२ महिलांना घेतला.
या योजनेची माहिती प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडियावरून सर्वत्र पोहचल्याने पहिल्याच दिवशी कोल्हापूर विभागाअंतर्गत येणाऱ्या बारा आगारात दिवसभर महिलांचीच गर्दी दिसत होती. कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानकात महिला प्रवाशांची संख्या सर्वाधिक दिसत होती. कोल्हापूर-गडहिंग्लज, कोल्हापूर-गारगोटी, कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-सांगली या बसेसमध्ये पहिल्या आसनापासून शेवटपर्यंत महिलांचीच संख्या सर्वाधिक होती. शुक्रवारी महामंडळाने ही योजना कार्यान्वित केली. अनेक महिलांना नियमित बस प्रवास करत असताना वाहकाने निम्मे तिकीट घेतल्यानंतर ही योजना सुरु झाल्याचा सुखद धक्काही बसला. याचा सर्वाधिक आनंद गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा आदी ग्रामीण भागातून आलेल्या महिलांना झाला. निम्मे तिकीटामुळे महिनाचा खर्च वाचणार अशी भावना अनेक महीलांनी व्यक्त केली. दिवसभर मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील बारा आगारामध्ये प्रवासासाठी महिलांचीच गर्दी होती. त्यामुळे विभागाच्या एकूण गल्ल्यात ४ लाख ४७ हजार २१४ रुपयांचे उत्पन्न जमा झाले.
पहिल्या दिवशी चाेवीस हजार महिलांचा प्रवास
आगार -प्रवासी संख्या-उत्पन्न
कोल्हापूर- १७४८-४१,७४९
संभाजीनगर-१३९०-३९,५४६
इचलकरंजी-३०३८-४१,२५७
गडहिंग्लज- ३६०२-६२, २७३
गारगोटी-१९५१-४८, ५३४
मलकापूर- १९४५-४३, ५७७
चंदगड-८७९-१९, ०८१
कुरुंदवाड-१९९१-२४, ३९४
कागल-३३९६-४४, ५५४
राधानगरी-८५०-१९,१५५
गगनबावडा-२२७-४, ०९८
आजरा-२९५४-३८, ९९६
एकूण -२३,९७१- ४, ४७, १२४
सर्वाधिक लाभ गडहिंग्लज विभागातून
या योजनेच्या पहिल्याच दिवशी गडहिंग्लज आगारातून ३ हजार ६०२ महिलांना दिवसभरात लाभ घेतला. त्यांच्या या अर्ध्या तिकीट आणि फुल्ल प्रवासातून महामंडळाला ६२ हजार २७३ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
निपाणीतून येणाऱ्या महिलांनाही लाभ
निपाणीतून कागल, कोल्हापूर, कुरुंदवाड, शिरोळ, पुणे आदी ठिकाणी प्रवास करणाऱ्या मुळ कर्नाटकातील रहिवासी महिलांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या बसमधून प्रवास करण्याची शक्कल लढविली.
कोल्हापूर विभागातून महिला सन्मान योजनेच्या सुरुवातीला २३ हजार ९७१ महिलांनी अर्ध्या तिकीटात फुल्ल प्रवास करीत उदंड प्रतिसाद केला.
- अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ , कोल्हापूर विभाग