भीमगोंडा देसाई - कोल्हापूर जिल्ह्यात नेमक्या शासकीय समित्या आहेत तरी किती? याचाच शोध जिल्हा प्रशासनातर्फे घेण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या आठवडाभरात करणार असल्याचे सांगितल्यावर या समित्या किती आहेत, याची माहिती घेतली जात आहे. आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल २४५ विविध समित्यांची माहिती उपलब्ध झाली आहे. दोन्ही काँग्रेसच्या सत्ताकाळात त्यांनी या समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्तीकडे फारसे लक्षच दिले नव्हते. त्यामुळे या समित्या कागदावरच राहिल्या. त्यामुळे आता नव्या पालकमंत्र्यांनी सदस्यांची नियुक्ती करण्याची घोषणा केल्यावर प्रशासनाने त्याचा शोध सुरू केला. त्यातून फारच भन्नाट माहिती पुढे आली. एकूण अधिकृत समित्या किती, त्यांचे काम कसे चालते, त्याचे सचिव कोण आहेत, त्यांचे अधिकार काय याचा पत्ता लागलेला नाही. प्रशासनाला आतापर्यंत २४५ समित्या शोधून काढण्यात यश आले. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काही समित्यांचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवल्याचे समजल्यानंतर तेथून माहिती घेतली आहे.ग्राहक तक्रार निवारण, महिला दक्षता, जिल्हा नियोजन, बालहक्क अशा तब्बल २८५ समिती असल्याची प्रशासनाची माहिती आहे. त्यातील बहुतांशी समित्यांमध्ये ‘अशासकीय सदस्य’ असतात. ‘सदस्य’ म्हणून सत्ताधारी नेते कार्यकर्त्यांना संधी देतात. पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी असले तरी अन्य कामाच्या व्यापातून इतक्या समित्यांच्या कामकाजात त्यांना थेट सहभाग घेणे शक्य नसते. त्यामुळे ‘सचिव’च समितीचा कारभार पाहतात. आवश्यक त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची सही घेतली जाते. अनेक वर्षांपासून असाच कारभार सुरू आहे. सर्व समित्यांमध्ये एकूण ‘अशासकीय सदस्य’ किती याचीही अद्ययावत संख्या या घडीला प्रशासनाकडे उपलब्ध नाही. परिणामी समित्याच माहीत नाही तर कामकाजाचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या समित्यांवरील सदस्यांना मोठा मान-सन्मान मिळतो असेही नाही. मात्र, लोकप्रतिनिधींना समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी दिल्याचे समाधान मिळते. कांही दिवसापंतर अनेक सदस्य नियमित बैठकांना येत नाहीत. जनतेलाही समितीच्या कामकाजाबद्दल देणे-घेणे नसते. कोणत्या समितीचे काय काम आहे, जबाबदारी कोणती आहे, याची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे समित्यांच्या कामकाजाबद्दल कोणी जाब विचारत नाही. परिणामी प्रशासनानेही या समित्यांकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. जिल्हा स्तरावर विविध २८५ शासकीय समित्या आहेत. सर्व समित्यांची माहिती संकलित केली जात आहे. आतापर्यंत २४५ समितींची माहिती संकलित झाली आहे. अजून माहिती घेण्याचे काम सुरू आहे. - विक्रांत चव्हाण, निवासी जिल्हाधिकारी
२४५ शासकीय समित्यांचा लागला ‘शोध’
By admin | Published: February 10, 2015 12:22 AM