इचलकरंजी : शहरामध्ये केंद्र शासन पुरस्कृत पीएम ई-बस सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याला नुकतीच राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अनेक वर्षांनंतर २५ सिटी बसेस शहरातून धावणार आहेत. कामगार वस्ती असलेल्या शहरातील नागरिकांना आता सिटी बसमधून प्रवास करता येणार आहे.देशातील परिवहन सेवेमध्ये सुधारणा करून हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने १६ ऑगस्ट २०२३ ला पी.एम.ई-बस सेवा ही योजना मंजूर केली होती. याअंतर्गत विविध राज्यात व केंद्र शासित प्रदेशांमार्फत दहा हजार ई-बसेस देशात चालविण्याचा केंद्राचा मानस आहे. त्यानुसार देशातील १६९ शहरांमध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली. त्यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील १९ शहरांची निवड करण्यात आली असून, त्यात इचलकरंजी महापालिकेचा समावेश आहे.या योजनेंतर्गत शहरामध्ये २५ ई-बसच्या मागणीचा प्रस्ताव महापालिकेच्या विद्युत विभागाकडून पाठविला होता. त्यानुसार या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. शासनाकडून यासाठी रक्कम उपलब्ध होणार आहे. शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत या बसेस चालविण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यक वाहन तळासाठी जागा, प्रशासकीय इमारत, चार्जिंग स्टेशन, वीजपुरवठा, आदी सुविधा महापालिकेला द्याव्या लागणार आहेत. गेल्या २५ वर्षानंतर शहरामध्ये पी.एम.ई-बस सेवेंतर्गत सिटी बस धावणार आहे.
सिटी बस कोणत्या मार्गावरून धावणार, हे महापालिका ठरविणार आहे. तसा मार्ग त्यांना देण्यात येईल. तसेच त्यांना आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यात येईल. यामुळे नागरिकांना शहरामध्ये प्रवास करणे सुकर होणार आहे. - ओमप्रकाश दिवटे, आयुक्त महापालिका