कोल्हापूर : वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा देवस्थानच्या २५ कोटींच्या विकास आराखड्याला मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबविताना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, बसस्थानक, जलपुनर्भरण, आदी गोष्टींचा समावेश करावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. आराखडा मंजुरीचा अध्यादेश व निधीची तरतूद होऊन प्रत्यक्ष विकासकामांची प्रक्रिया सुरू होण्यासाठी किमान पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागणार आहे. कोल्हापूरच्या पर्यटनवृद्धीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीद्वारा जोतिबा मंदिराचा २५ कोटींचा विकास आराखडा विभागीय आयुक्तांनी सुचविलेल्या सूचनांचा अंतर्भाव करून महिन्याभरापूर्वी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी निवडणुका असल्याने आराखडा मंजुरीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. पाच जिल्ह्यांंतील तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजुरी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिखर समितीची बैठक झाली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, जोतिबाच्या सरपंच रिया सांगळे, उपसरपंच जगन्नाथ दादर्णे, ग्रामपंचायत सदस्य अजित भिवदणे, दिनकर कांबळे, सुनीता मिटके, पद्मा सातार्डेकर, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, अभियंता सुदेश देशपांडे, सदस्य बी. एन. पाटील मुगळीकर, सुजय पाटील, आदी उपस्थित होते.यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी मुख्यमंत्र्यांसमोर जोतिबा मंदिर विकास आराखड्याचे सादरीकरण केले. त्यावर पंधरा मिनिटे चर्चा झाली. वित्तमंत्री मुनगंटीवर यांनी विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना त्यांच्या कामाचे नियोजन, दर्जा यांकडेही विशेष लक्ष द्यावे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राची तरतूदही या आराखड्यात करण्यात यावी, असे सांगितले. जोतिबा मंदिर आराखड्यानुसार सेंट्रल प्लाझा परिसराचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. परिसरातील विद्युत पुरवठा भूमिगत करणे, यात्रेकरूंसाठी भक्तनिवास बांधणे, दर्शन मंडप उभारणी, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन व पर्जन्य जल्पुनर्भरण, आदी कामांचा समावेश आहे. भक्तनिवासामध्ये कुटुंबांसाठी २२ खोल्या व तीन मोठे हॉल बांधण्यात येणार आहेत. आठ ते दहा हजार क्षमतेचा दर्शन मंडप उभारण्यात येणार आहे. सेंट्रल प्लाझा येथे अॅम्पिथिएटरप्रमाणेच व्यवस्था करण्यात येणार असून, तेथे साहित्यविक्रीची दुकानेही असणार आहेत.देवस्थानकडून साडेचार कोटींची कामे मंजूर करण्यात आलेल्या आराखड्यासाठीचा संपूर्ण निधी राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे. मंदिराच्या अंतर्गत परिसराचे जतन, संवर्धन व अन्य विकासकामे देवस्थान समितीच्यावतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी समितीतर्फे साडेचार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जोतिबा विकास आराखडा मंजूर केल्याबद्दल जोतिबा ग्रामस्थांच्यावतीने सरपंच रिया सांगळे यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना जोतिबाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सत्यजित पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
जोतिबा मंदिराचा २५ कोटींचा आराखडा मंजूर
By admin | Published: March 15, 2017 1:12 AM