आयआरबीने केलेल्या रस्त्यांना आता दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. दहा वर्षात जलवाहिन्या दुरुस्तीच्या नावाखाली शहरातील काही भागात सिमेंटने केलेले रस्ते ब्रेकर लावून खुदाई करण्यात आली; परंतु ते रस्ते नंतर महापालिकेला दुरुस्त करता आले नाहीत. सिमेंटच्या रस्त्यालगत असलेले डांबरी रस्ते दोन ते तीन इंचाने खचले आहेत, त्याचीही दुरुस्ती करता आलेली नाही; परंतु हे नादुरुस्त झालेले रस्ते दुरुस्ती करणे आवश्यक बनले आहे.
या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अंदाजे २५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे आणि इतका खर्च महापालिकेला पेलवणारा नाही. म्हणून नगरविकास विभागाने एवढा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करणारा प्रस्ताव तयार करून तो मंजुरीकरिता पाठविण्यात आला आहे. यावर नगरविकास विभाग सकारात्मक विचार करील, अशी अपेक्षा आहे.