कोल्हापूर : महानगरपालिकेच्या मालकींच्या गाळ्यांचे रेडीरेकनर (बाजारमुल्य) दराने भाडेआकारणी सुरु झाल्यामुळे अनेक भाडेकरुंना ते मान्य नाही, त्यामुळे गाळ्यांची थकबाकी सुमारे २५ कोटी रुपयांपर्यत पोहचली असल्याची धक्कादायक माहिती प्रशासनाने शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जाहिर केली. सुविधा देत नसाल तर रेडीरेकनर पध्दतीने भाडेपध्दतीचा अवलंब का करता? असाही प्रश्न सदस्यांनी प्रशासनास विचारला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.शहरातील रिकाम्या दुकानगाळ्याची निवीदा मागवून आलेल्या देकारप्रमाणे भाड्याने देण्याबाबतचा इस्टेट विभागाने प्रस्ताव सभेसमोर आणला. इस्टेट अधिकारी प्रमोद बराले यांनी सविस्तर माहिती दिली. दुकानदारांकडून रेडीरेकनर भावाने भाडेपट्टी आकारणी घेता पण त्यांना योग्य सुविधा देत नसल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी केला. थकीत रक्कम गाळेधारकांच्या व्यक्तीगत मालमत्तेतून वसूल करावी अशी सुचना भूपाल शेटे यांनी मांडली. हॉकी स्टेडीयमच्या दुकानगाळ्यांचा विकास कधी करणार? असाही प्रश्न किरण नकाते यांनी विचारला. स्टेडीयमचे दुकानगाळे दुरुस्तीसाठी ५ कोटींचा प्रस्ताव तयार केल्याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.उमा बनसोडे, रुपाराणी निकम, अजीत ठाणेकर यांनी, शहरात किती दुकानगाळे रिकामे आहेत, भाडे थकीत किती आहे, किती गाळ्यांचा वाद सुरु आहे याची माहिती देण्याची विनंती केली. शहरात महापालिकेच्या मालकीच्या दुकानगाळ्यांचे रेडीरेकनर पध्दतीने भाडेआाकरणी मान्य नसल्याने गाळेधारक न्यायालयात गेले, त्यांचे २५ कोटी रुपये भाडे थकीत असल्याची माहिती इस्टेट अधिकारी बराले यांनी सभागृहासमोर ठेवली.थकबाकी वसूलीसाठी समन्वयाचा मध्य काढावा अशी विनंती उमा बनसोडे, अजीत ठाणेकर, आशिष ढवळे यांनी प्रशासनाला केली. आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी, शासनाच्या निर्देशनुसार रेडीरेकनर दरापेक्षा कमी दराने महापालिकेची कोणतीही मिळकत भाडेपट्टीने देता येत नसल्याचे सांगितले. त्यावर पुढील सभेत रेडीरेकनर नको, योग्य भावाने दुकानगाळे द्यावेत असा ठराव करुन शासनाला पाठविण्याचा निर्णय झाला.
उंच इमारती, लिफ्टची वणवा... कार्टून सभागृहाततौफीक मुलाणीसह लाला भोसले आणि प्रविण केसरकर यांनी कार्टून रेखाटलेली तीन पोष्टर सभागहृात दाखवत महापालिकेच्या इमारतींचे वाभाडे काढले. ‘उंच इमारतींची बंद लिफ्ट, अग्निशमन दलाकडे उंच इमारतीसाठी उंची शिडी नाही, इमारत चढताना धापा टाकणारे ज्येष्ठ नागरीक’ अशी तीन कार्टून पोष्टर सभागृहात सादर केले.इमारतींच्या लिफ्ट बंद, सुविधांचा बोजवारा अशा अवस्थेत रेडीरेकनर दरांने तुमचे दुकानगाळे अगर आॅफीस नागरीकांनी का घ्यावेत?असा प्रश्न केला. यावेळी शिवाजी मार्केटमधील इमारतीत सोमवारपासून लिफ्ट सुरु होईल व राजारामपूरी नगररचनाच्या इमारतीत दुरुस्ती येत्या आठवड्यात करु अशी ग्वाही शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.
महापालिकेचे दुकानगाळे
- एकूण दुकानगाळे : १९३८
- भाडे मुदत संपलेले दुकानगाळे : १३००
- रिकामे दुकानगाळे :३२