कोल्हापूर : वेंगुर्ले (जि. सिंधुदुर्ग) येथील सातेरी देवीच्या उत्सवासाठी येथील मूर्तिकार सुदेश बाळकृष्ण बुधले यांनी तब्बल ३५ किलो चांदीपासून अत्यंत देखणी पालखी तयार केली आहे. देवीचा उत्सव येत्या २४ फेब्रुवारीस असून त्याच्याअगोदर ही पालखी देवीच्या चरणी वाहिली जाणार आहे. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून गोळा केलेल्या रकमेतून ही पालखी केली असून त्यासाठी सुमारे २५ लाख रुपये खर्च आला आहे.
बुधले यांचा देव-देवतांसाठी लागणाऱ्या चांदीच्या विविध वस्तू व दागिने तयार करण्याचा पिढीजात व्यवसाय आहे. कोल्हापुरातील वांगीबोळात ते हा व्यवसाय करतात. या कामात मुलगा अभिषेकही त्यांना मदत करतो. देवासाठी लागणारी प्रभावळ, छत्र, किरिट, मुकूट, गदा अशा विविध सुबक वस्तू अत्यंत श्रध्देने ते करत आले आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाईच्याच मंदिरात त्यांनी केलेल्या किमान २५ हून अधिक वस्तू आहेत. अंबाबाईची प्रभावळही त्यांच्या वडिलांनीच केली आहे. महाराष्ट्रातील असे एकही मंदिर नाही, की ज्या प्रसिध्द मंदिरात बुधले यांनी केलेली कोणती ना कोणती चांदीची वस्तू देवाच्या सेवेत नाही.
वेंगुर्ले येथील देवीची पालखी करण्यासाठी त्यांना किमान दोन महिने लागले आहेत. पालखीवर अत्यंत सुबक नक्षीकाम केले आहे. कणकवली येथील भालचंद्र महाराज यांची समाधी २७ किलो चांदीने त्यांनीच मढवली आहे. त्यांच्या वडिलांनी अमेरिकेमध्ये येसूची सोन्याची मूर्ती व चांदीचा क्राॅसही तयार केला होता.
१५०२२०२१-कोल-चांदीची पालखी
कोल्हापुरातील शिल्पकार सुदेश बुधले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील सातेरी देवीसाठी ३७ किलो चांदीपासून अशी देखणी पालखी तयार केली आहे.