कोल्हापूर : मराठी चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ दिग्दर्शक स्वर्गीय यशवंत भालकर यांचे स्मारक केशवराव भोसले नाट्यगृह येथे करावयाचे नियोजन असून, त्याकरिता बजेटमध्ये २५ लाखांची तरतूद करण्यात आल्याची माहिती महापौर सरिता मोरे यांनी शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत दिली.स्वर्गीय भालकर यांच्या स्मारकाच्या अनुषंगाने महापौर सरिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.यशवंत भालकर यांचे चित्रपटसृष्टीत महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांचे स्मारक केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात करावे, अशी विनंती संग्राम भालकर यांनी केली. त्यांचे स्मारक भित्तीशिल्प स्वरूपात असावे, अशी मागणी स्मारक समितीच्या वतीने करणेत आली.महापौर मोरे यांनी प्रथम जागा निश्चित करण्यात यावी, अशी सूचना केली. याबाबत पुन्हा दि. ४ जून रोजी बैठक घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी आपण केशवराव भोसले नाट्यगृहात या स्मारकारासाठी जागा पाहून निश्चित करण्याबाबत स्मारक समितीस सांगितले.यावेळी विरोधी पक्षनेता विलास वास्कर, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, अखिल भारतीय मराठा चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्यवाह बाळ जाधव, स्वप्ना जाधव-भालकर, शिल्पकार किशोर पुरेकर, सतीश बिडकर यांच्यासह स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.