कोल्हापूर : येथील शाहू स्टेडियम मैदानावर सुरू असलेल्या फुटबॉल सामन्यादरम्यान बुधवारी (दि. ७) रात्री परदेशी फुटबॉलपटू व्हिक्टर जॅक्सन याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी महिपतराव ऊर्फ पापा बोंद्रे व त्यांचा नातू व माजी महापौर सई खराडे यांचा मुलगा शिवतेज खराडे या दोघांसह २० ते २५ कार्यकर्त्यांवर आज (गुरुवार) जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी सांगितले की, व्हिक्टर जॅक्सन हा बुधवारी फुटबॉल प्रीमिअर लीग २०१४ स्पर्धेचा साखळी सामना खेळत असताना रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पापा बोंद्रे व त्यांचा नातू शिवतेज हे २० ते २५ कार्यकर्त्यांना घेऊन थेट शाहू स्टेडियममध्ये घुसले. यावेळी त्यांनी फुटबॉल सामना बंद पाडला व २ फेब्रुवारीला केएसए लीग सामन्यात शिवतेज खराडेला झालेल्या मारहाणीच्या रागातून व्हिक्टर जॅक्सन याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी छत्री, पाण्याच्या बाटल्या, खुर्चीचा वापर करण्यात आला. खेळाडूला अचानक मारहाण झाल्याने मैदानावर गोंधळ उडाला. सुमारे २0 मिनिटे हा प्रकार सुरू होता. यावेळी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी जॅक्सन याची सुटका करून घेतली. या मारहाणीत जॅक्सन गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी संयोजकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी शिवप्रसाद मालोजीराव भोसले (वय ४७, रा. राजारामपुरी अकरावी गल्ली) यांनी फिर्याद दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इंद्रजित सोनकांबळे करीत आहेत. (प्रतिनिधी)
पापा बोंद्रेंसह २५ जणांवर गुन्हा फुटबॉल सामन्यात घुसून मारहाण : परदेशी खेळाडू व्हिक्टर जॅक्सन गंभीर जखमी
By admin | Published: May 09, 2014 12:34 AM