लोकमत न्यूज नेटवर्क
कोगनोळी : केंद्र सरकारने अनेक वेळा मुदतवाढ देऊन शेवटी मंगळवार दिनांक १६ फेब्रुवारीपासून फास्टॅग सक्तीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत ७५ टक्के वाहनांनी फास्टॅग काढून घेतले असले तरी, अद्याप २५ टक्के वाहने फास्टॅगविनाच प्रवास करतात. त्यांच्याकडून फास्टॅग सक्तीची अंमलबजावणी सुरू झाल्याने दुप्पट टोल वसूल करण्यात आला.
कोगनोळी टोल नाक्यावरून सरासरी बारा ते सोळा हजार वाहने रोज प्रवास करतात. यापैकी ७५ टक्के वाहनेच फास्टॅग काढून घेऊन त्याद्वारे टोल भरतात. इतर २५ टक्के वाहनांकडे फास्टॅग नसल्याने त्यांना दुप्पट टोल भरावा लागला. या टोल नाक्यावर गेल्या अनेक दिवसांपासून फास्टॅग सक्तीविषयी ध्वनिक्षेपकावरून प्रबोधन करण्यात येत होते.
दोन दिवसात पाचशे ते आठशे फास्टॅगची विक्री कोगनोळी टोल नाका परिसरात आयसीआयसीआय बँक पेटीएम पेमेंट बँक एअरटेल पेमेंट बँक यांच्यावतीने फास्टॅगची विक्री करण्यात येत आहे. सोळा तारखेपासून फास्टॅग बंधनकारक होत असल्याने या ठिकाणावरून दोन दिवसात पाचशे ते आठशे फास्टॅगची विक्रमी विक्री झाली.
एका मिनिटात दहा गाड्यांचा टोल वसूल
रोखीने टोल भरताना एका गाडीला चार ते पाच मिनिटे वेळ लागतो. परंतु फास्टॅगमुळे आपोआप टोलची रक्कम कपात होत असल्याने, एका गाडीला पाच ते सहा सेकंद लागतात. त्यामुळे एका मिनिटात दहा गाड्यांचा टोल वसूल होतो.
फास्टॅग असून दुप्पट टोल काही वाहनधारकांनी फास्टॅग घेतले होते. परंतु त्या खात्यामध्ये रक्कम शिल्लक नसल्याने त्यांना दुप्पट टोल भरावा लागत होता. अशा वाहनधारकांना टोलवरील कर्मचाऱ्यांनी सहकार्य करून रिचार्ज केल्यानंतर एक वेळ टोल घेऊन पुढे सोडले.
फोटो ओळ :
१. फास्टॅगमुळे वेळेची बचत होत असल्याने टोल नाक्यावरील गर्दी कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. २. फास्टॅग बंधनकारक झाल्याने टोल नाका परिसरातील फास्टॅग विक्री केंद्रावर वाहनधारकांनी गर्दी केल्याचे दिसून येत होते.
छाया : बाबासोा हळिज्वाळे