संदीप आडनाईककोल्हापूर : लहानपणापासून आजीने सांभाळले, भाड्याच्या घरात राहत धुणी-भांडी करीत आईने एकटीने संसाराचा गाडा हाकलला. स्वत: कोणतीही शिकवणी न लावता मसाला पानाचे विडे वळत अर्धवेळ नोकरी करत शिकणाऱ्या शिवाजी पेठेतील २५ वर्षीय मनाली शिंदे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या अराजपत्रित गट ब संवर्गातील पोलिस उपनिरीक्षक पदासोबत नगर परिषदेच्या लेखाधिकारी परीक्षेतही बाजी मारून आजी आणि आईचे स्वप्न पूर्ण केले.जन्मल्यापासून मनाली इचलकरंजीत आईकडे राहण्याऐवजी कोल्हापुरात शिवाजी पेठेत आजी शशिकाला मारुती पाटील हिच्याकडेच वाढली. सरनाईक बोळातील आदर्श प्रशालेत आजी शिपाई म्हणून काम करत होत्या. नातीलाही त्यांनीच वाढवले. नोकरी करताना तान्हुली मनालीला शाळेतील व्हरांड्यातच पोत्यावर झोपवायच्या. पुढे मुख्याध्यापक झालेल्या आर. वाय. पाटील यांच्यामुळे मनालीलाही शिक्षणाची गोडी लागली. वाचन संस्कार घडले.नातीने शिकून चांगली नोकरी करावी इतकीच माफक अपेक्षा असणाऱ्या आजीचा २००८ मध्ये मृत्यू झाल्यानंतर आईने चार घरची धुणी-भांडी करून मनालीला शिकवले. मोठा मुलगा दहावीपर्यंतच शिकला; परंतु मनालीने दहावीत ८८ टक्के, बारावीत ८१ टक्के, बीकॉमला ७५ टक्के आणि एमकॉमला ७० टक्के गुण मिळविले. पी. बी. साळुंखे, आदर्श प्रशाला, डीडी शिंदे, शिवाजी विद्यापीठामधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.आठवीत असताना अवनी संस्थेने शिष्यवृत्ती दिली, त्यातून मनालीने शिक्षणाचा खर्च भागवला. आई आणि बहिणीला कुटुंबातून फारसे सहकार्य मिळाले नाही; पण मावशी आणि मित्रमंडळींनी मदत केली. घर चालवण्यासाठी मनालीने एका पानमंदिरमध्ये मसाला पानांचे विडे वळण्याचे अर्धवेळ काम पत्करले. पाच वर्षे काम करत मिळणाऱ्या दोन हजार पगारातून आईलाही हातभार लावला. त्यातूनही कोणतीही शिकवणी न लावता तिने स्वत: रोज आठ तास अभ्यास करत पीएसआय परीक्षेत उत्तीर्ण होत आजीचे स्वप्न साकार केले.राज्यात १६ वी, लेखाधिकारी परीक्षेतही उत्तीर्णमनालीने ऑक्टोबर २०२२ मध्ये उपनिरीक्षक पदासाठी आयोगाची पूर्वपरीक्षा आणि अंतिम परीक्षा दिली. २०२३ मध्येही तिने नगर परिषदेची लेखाधिकारी परीक्षाही दिली. पोलिस उपनिरीक्षक पदासाठी मुंबईत ४ जून रोजी शारीरिक आणि २ जुलै रोजी मुलाखत दिली. त्यात राज्यात मुलींमध्ये तिने १६ वा क्रमांक मिळविला. बरोबरीने १० जून रोजी लेखाधिकारी परीक्षेतही ती उत्तीर्ण झाली.
Kolhapur: आईने धुणी-भांडी करून शिकवले, २५ वर्षीय मनालीने जिद्दीने पीएसआय बनून आयुष्य बदलले
By संदीप आडनाईक | Published: August 03, 2024 6:32 PM