कोल्हापूर : जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रातर्फे विद्यापीठ हायस्कूल येथे आज, रविवारी आयोजित रोजगार मेळाव्यातून २६७ जणांना नोकरीची संधी मिळाली. कोल्हापुरातील नामांकित अशा १७ आस्थापनांच्या व्यवस्थापकांना या मेळाव्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. एकूण ३५० रिक्त पदांसाठी हा मेळावा झाला. सकाळी दहा वाजल्यापासून या रोजगार मेळाव्यास सुरुवात झाली. बेरोजगार युवकांच्या तुडुंब गर्दीने हा परिसर गजबजून गेला होता. सुशिक्षित तरुणांची गर्दी तासागणिक वाढत होती. हायस्कूलच्या बाहेरील फलकांवर आस्थापनाचे नाव, रिक्त पदाचे नाव, संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, तसेच खोली नंबर लावण्यात आले होते. त्याप्रमाणे उमेदवार आपल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे मुलाखतीस जात होते. १८ ते ३५ वयोगटांतील उमेदवारांसाठी एकूण ३५० जागांसाठी हा मेळावा झाला. सुमारे ४४८ बेरोजगारांनी या मेळाव्यास भेट दिली.या मेळाव्यासाठी १२०५ उमेदवारांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ४४८ जण उपस्थित होते. यातून २६७ जणांना नोकरी मिळाली. रोजगार व स्वयंरोजगार केंद्राचे सहायक संचालक गं. अ. सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा झाला. यावेळी रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी वसंत माळकर, एस. के. माळी, केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. १सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींचा शासकीय नोकरीच पाहिजे, असा अट्टहास असल्याने अनेकजण संधी असूनही खासगी नोकरीकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आज मेळाव्यात दिसून आले. १२०५ जणांनी या मेळाव्यासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज केले होते. त्यापैकी प्रत्यक्षात फक्त ४४८ जणच मुलाखतीस उपस्थित राहिले. ३५० विविध पदांच्या रिक्त जागा असताना सुद्धा ८३ पदे रिक्तच राहिल्याने अनेक युवकांनी नोकरीची संधी असूनसुद्धा मेळाव्याकडे पाठ फिरवली. २मेळाव्यात आॅपरेटर, जॉब वर्क, ट्रेनी कामगार, क्लार्क, फिटर, ट्रेनी, हेल्पर, सेल्स कन्सल्टंट्स, मशीन आॅपरेटर, विमा सल्लागार, टेलिफोन आॅपरेटर, क्वॉलिटी इन्स्पेक्टर, सी.एन.सी. आॅपरेटर, वेल्डर या रिक्त पदांसाठी मुलाखती झाल्या. ३शैक्षणिक पात्रता : आठवी पास, दहावी पास-नापास, बारावी, बी.एस्सी., बी.कॉम., बी.ए., आय.टी.आय., पदवीधर अशा विविध शैक्षणिक पात्रता होत्या.
२६७ जणांची नोकरी ‘फिक्स’
By admin | Published: September 14, 2014 11:19 PM