लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : कुंभी कासारी साखर कारखान्याच्या कामगारांचे गेल्या वर्षभरापासून थकलेले पगार व इतर देण्यापोटी थकीत असलेली २६ कोटी ७४ लाख रुपयांची देणी त्वरित देण्यात यावी, या मागणीचे पत्र कामगार संघटनेने प्रशासनाला दिले आहे. पगार न मिळाल्यास कामगार कोणत्याही क्षणी आंदोलनाचे शस्त्र हातात घेतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
कुंभी कासारी साखर कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०२० ते मे २०२१ या महिन्याचे वेतन कारखान्याकडे थकीत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे बँका, पतसंस्था, विमा, भविष्य निर्वाह निधीसह अनेक देणी कारखान्यांकडून थकलेली आहेत. याचा परिणाम कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कारखाना प्रशासनाकडे कामगार संघटना वारंवार थकीत देणी देण्यासाठी विनवण्या करत आहेत. पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने कामगारांमध्ये नाराजी वाढली आहे. कारखान्याकडे कामगारांच्या थकीत असलेल्या २६ कोटी ७४ लाख देण्याकडे दुर्लक्ष केल्यास कर्मचारी कोणत्याही क्षणी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचे पत्र संघटनेचे सरचिटणीस सुभाष गुरव यांनी कारखाना प्रशासनाला दिल्याने कामगार संघटना व प्रशासनात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
थकीत असणारी देणी १) सप्टेंबर २०२० ते मे २०२१ वेतन - १८ कोटी ७२ लाख ३५ हजार ६५८ २) नोव्हेंबर २०२० ते मे २०२१ भविष्य निर्वाह निधी - ३ कोटी ६९ लाख ७४ हजार ९०६
३) मार्च २०२१ ते मे २०२१ - ३२ लाख ४) हंगामी कर्मचारी बेकार भत्ता - ७५ लाख ५) सेवानिवृत्त कर्मचारी ग्रॅच्युटी मे २०१९ ते २०२१ -३ कोटी ७५ लाख
एकूण - २६ कोटी ७५
प्रतिक्रिया
कामगारांनी साखर उद्योगापुढे असणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन बोनस व इतर सुविधांची मागणी बंद केली आहे. गेली दोन वर्षे पगारातील अनियमिततेने बँका, पतसंस्थाकडून पगार तारणावर घेतलेल्या कर्जाचे हप्ते न गेल्याने व्याजाचा भुर्दंड बसत आहे. विमा, भविष्य निर्वाह निधी हप्ते थकल्याने क्लेम मिळेणात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी दोन वर्षे झाले तरी मिळेना, यामुळे कामगारांत असंतोष निर्माण झाला असून, किमान महिन्याला पगार तरी करा एवढी माफक मागणी आहे; पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
-संदीप भोसले, उपाध्यक्ष, कुंभी साखर कामगार