लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : राज्य शासनाने मिशन ब्रेक द चेनअंतर्गत कोरोना निर्बंध लागू केले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात २७० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाच ठिकाणी नाकाबंदी करणार असून, अत्यावश्यक म्हणून सहा स्ट्रायकिंग फोर्स व एक दंगा नियंत्रण पथक असणार आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी दिली.
राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शुक्रवारी रात्री ८ पासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत वीकेंड लॉकडाऊन पुकारला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वळता इतर आस्थापना बंद राहणार आहेत. शहरामध्ये शहापूर, शिवाजीनगर, गावभाग या पोलीस ठाण्यांतील एकूण १२ अधिकारी, १५० कर्मचारी बंदोबस्तासाठी असणार आहेत. तसेच पोलीस मुख्यालयातील राखीव दलाचे ६० कर्मचारी बंदोबस्तासाठी घेण्यात आले आहेत.
कबनूर, नदीवेस नाका, यड्राव फाटा, पंचगंगा साखर कारखाना, रिंग रोड या पाच ठिकाणी तपासणी नाके करण्यात आले आहेत. दरम्यान, जनता चौक, शिवाजी पुतळा, झेंडा चौक याठिकाणी विशेष पोलीस पथक असणार आहे. हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायामध्ये होम डिलिव्हरी करता येणार आहे. तरी नागरिकांनी घराबाहेर न पडता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.