आॅनलाईन लोकमत/संतोष मिठारी
कोल्हापूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अन्वये (आरटीई) पहिलीच्या २५ टक्के आरक्षित प्रवेश प्रक्रियेअंतर्गत २७०९ जागा अद्यापही रिक्त आहेत. प्रवेशासाठी पहिल्या फेरीत तीनवेळा मुदतवाढ देऊनही ५६० विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती झाली आहे. विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळणाऱ्या ‘आरटीई’कडे पालकांनी पाठ फिरविली असल्याचे दिसत आहे.
‘आरटीई’च्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेशासाठी जिल्ह्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित ३२१ शाळांमध्ये ३२६९ जागा आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
प्रवेशाच्या ३२६९ जागांवरील प्रवेशासाठी २ मार्चअखेर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण १३३० आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी एकूण ११५९ पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आरटीई आॅनलाईन प्रणालीद्वारे ‘एसएमएस’ पाठविण्यात आले होते.
ही फेरी २५ मार्चला संपली. त्यात ५२४ विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत, तर २१० विद्यार्थी अपात्र ठरले. यानंतर संबंधित पहिल्या फेरीअंतर्गत प्रवेशासाठी तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. यामध्ये अवघ्या ३६ जणांची प्रवेश निश्चिती झाली. यापूर्वी ज्यांनी प्रवेश अर्ज दाखल केले नव्हते. त्यांच्यासाठी अर्ज करण्याची संधी ही दुसऱ्या फेरीद्वारे प्राथमिक शिक्षण विभागाने ३० एप्रिलपासून उपलब्ध करून दिली.
याअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम मुदत बुधवार (दि. १० मे) पर्यंत आहे. मागासवर्गीय, दुर्बल व वंचित घटकांतील मुलांना आरटीईअंतर्गत सीबीएसई, एसएससी, आदी माध्यमांच्या विनाअनुदानित शाळांमध्ये आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळते. मात्र, पालकांची काहीशी उदासिनता, योग्य पद्धतीने लक्ष न देण्याच्या वृत्तीमुळे संबंधित प्रवेशासाठी संधी असूनदेखील पात्र असणाऱ्या मुलांना या मोफत शिक्षणापासून वंचित राहावे लागणार असल्याचे दिसत आहे. राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेली ही शिक्षणाची संधी साधण्यासाठी पालकांनी जागे होण्याची आवश्यकता आहे.
पालकांनी तत्काळ अर्ज करावा
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने प्रवेशाबाबत फेब्रुवारीपासून विविध माध्यमांतून जनजागृती सुरू केली असल्याचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले यांनी सांगितले. ते म्हणाले, प्रत्येक शाळेच्या आवारात आरटीई प्रवेशाची माहिती देणारे फलक लावले होते. जिल्ह्यात २६ मदत केंद्रे कार्यन्वित होती. पहिल्या फेरीमध्ये प्रवेश निश्चितीसाठी तीनवेळा मुदतवाढ दिली. ज्यांचे अर्ज अपात्र ठरले त्यांना प्रवेश नाकारण्यात आले. विद्यार्थी हितास्तव प्रवेशासाठी अर्ज करण्याची दुसरी फेरी ३० एप्रिलला सुरू असून, त्याची अंतिम मुदत १० मेपर्यंत आहे. ज्यांनी प्रवेश प्रक्रियेत अर्ज केला नव्हता. त्यांना या फेरीत अर्ज करता येईल. ‘आरटीई’अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतची ट्युशन फी सरकारद्वारे भरली जाते. त्यामुळे एकप्रकारे मोफत शिक्षण मिळते. ते लक्षात घेऊन प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तत्काळ अर्ज करावा.
गेल्या चार वर्षांतील प्रवेशाची आकडेवारी
२०१२-१३ : ४२५
२०१३-१४ : ८०४
२०१४-१५ : ११८१
२०१५-१६ : १७०९
आरटीईद्वारे समाजातील वंचित व दुर्बल घटकांतील मुलांच्या शिक्षणाला बळ मिळत आहे. मात्र, याअंतर्गत होणाऱ्या प्रवेशाबाबत संबंधित घटकांतील अधिकतर पालकांमध्ये जागृती नाही. त्यामुळे प्रवेश निश्चितीची आकडेवारी कमी दिसते. हे वास्तव लक्षात घेता शाळांनी आरटीई प्रवेशाबाबत जागृतीसाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
- मोहन आवळे,
मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्य खासगी शिक्षक, शिक्षकेतर महासंघ