लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या घटत असल्याने आरोग्य प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्थांतर्फे कार्यरत एकूण ४७ पैकी २९ कोविड केअर केंद्रे नुकतीच बंद केली आहेत. ही सर्व केंद्रे कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर मार्चपासून सुरू होती; पण अलीकडे रुग्णसंख्या हजारांच्या आत आल्याने केंद्रे बंद करण्यात येत आहेत. बंद केलेल्यांत सर्वाधिक शहरातील १४ केंद्रांचा समावेश आहे.
कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा व्यापक प्रमाणात राहिली. सर्वांत जास्त रुग्ण शहर आणि करवीर तालुक्यात आढळले. जिल्ह्यात एका दिवसात तब्बल अडीच हजार बाधितांची संख्या पोहोचली होती. मे महिन्यात तर कोरोनाचा उद्रेक झाला. परिणामी बाधितांना बेड मिळत नव्हते. वेळेत ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने आणि योग्य उपचार न झाल्याने काही रुग्णांना जीव गमवावा लागला. यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाने कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेतला. आवश्यकतेनुसार त्यांची संख्या वाढवत नेली. शहरात महापालिकेतर्फे १८ केंद्रे चालविली जात होती. त्यांपैकी आता केवळ चार केंद्रेच कार्यरत आहेत. जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी २९ केंद्रे सुरू होती. त्यांपैकी १५ केंद्रे बंद करण्यात आली आहेत. करवीर, हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी दोन, तर उर्वरित तालुक्यात प्रत्येक एक केंद्र कार्यरत आहे.
चौकट
बंद कोरोना केंद्रातील नर्स, डॉक्टर बेरोजगार
कोविड केअर केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. केंद्रातील मनुष्यबळ आणि रुग्णांच्या जेवण, नाष्टा, चहापाण्यावर महिन्याला सरकार खर्च करीत होते. आता केंद्र बंद झाल्याने सरकारचा होणारा खर्च वाचणार आहे; पण केंद्रात काम करणाऱ्या बहुतांश बीएएमएस डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचाऱ्यांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.
...............
शहरात चार केंद्रे कार्यरत
शहरात शिवाजी विद्यापीठातील डीओटी सेंटर, आयसोलेशन हॉस्पिटल, राजोपाध्येनगरातील साने गुरुजी कोविड रुग्णालय, कसबा बावड्यातील पॅव्हेलियन हॉलमधील केंद्र सुरू आहे. ही केंद्रे रुग्णांची संख्या पूर्णपणे कमी झाल्यानंतरच बंद करण्यात येणार आहेत. महापालिकेतर्फे चालवण्यात येणारी केंद्रही बंद झाल्याने तेथील आरोग्य यंत्रणेने साथीच्या इतर आजारांवर लक्ष केंद्रित केले आहे.
कोट...
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या अलीकडे झपाट्याने कमी होत आहे. यामुळे गरज नसलेली तालुक्याच्या ठिकाणची कोविड केंद्रे बंद केली आहेत. आवश्यकता वाटल्यास केंद्रे पुन्हा सुरू करण्यात येतील.
- डॉ. योगेश साळी, जिल्हा आरोग्याधिकारी
कोट
महापालिकेच्या नियंत्रणाखाली १८ कोविड केअर सेंटर सुरू होती. त्यांपैकी १४ केंद्रे बंद केली आहेत. चार केंद्रे कार्यरत आहेत. शहरातील रुग्णांची संख्या कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
रविकांत आडसूळ, उपायुक्त, महापालिका