कोल्हापूर : येथील गुजरीतील प्रसिद्ध कर सल्लागार अरुण विठ्ठल माने यांनी मृत्युपत्रात व्यक्त केलेल्या इच्छेनुसार तब्बल २९ लाख रुपयांचा धनादेश शुक्रवारी येथील बालकल्याण संकुलास प्रदान करण्यात आला. माने कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे साडू पांडुरंग पाटील व त्यांच्या पत्नी रागिनी पाटील यांनी हा धनादेश संस्थेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयात अनौपचारिक कार्यक्रमात सुपूर्द केला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष व्ही.बी.पाटील, मानद कार्यवाह पदमा तिवले उपस्थित होते. एखादी व्यक्ती गेल्यावर त्यांच्या मालमत्तेवरून अनेक कुटुंबांत टोकाचे संघर्ष सुरू असलेल्या काळात माने यांनी मृत्यूनंतरही कृतीतून अनोखी मानवसेवा केली.माने हे मूळचे सातारा जिल्ह्यातील म्हसवडचे. कोल्हापुरात तब्बल ४० वर्षे कर सल्लागार म्हणून काम केले. समाजऋण मानून काम करणाऱ्या माने यांना अपत्य नव्हते. पत्नी रेखा माने यांचे २०१९ मध्ये निधन झाले. आपली मालमत्ता समाजातील चांगले काम करणाऱ्या संस्थांना द्यावी, असे मृत्युपत्र त्यांनी केले होते. पांडुरंग पाटील व कार्यालयीन सहकारी कृष्णात वीर यांच्याकडे त्यांनी त्यासंबंधीचे अधिकार दिले. संस्थेच्या तिवले यांच्याशी पांडुरंग पाटील यांचे जुने ऋणानुबंध असल्याने त्यांनी बालकल्याण संकुलास प्राधान्य दिले. माने यांचे २६ फेब्रुवारी २०२२ ला निधन झाले. संपत्तीचा वाटप व्यवहार तपासण्यासाठी ॲड. अजित कुलकर्णी यांची माने यांनीच नियुक्ती केली होती. त्यानुसार ॲड. कुलकर्णी व वीर यांनी बालकल्याण संकुलास भेट दिली. या संस्थेत अनाथ निराधार, मुले-मुली यांचे आयुष्य उत्तम घडवले जात असल्याचे आणि आपण दिलेला पैसा तिथे योग्य कामासाठीच अत्यंत पारदर्शीपणाने वापरला जात असल्याचे पाहून त्यांना समाधान वाटले. संस्थेला निधी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बालकल्याण संकुलातील एका कक्षास दिवंगत माने यांच्या पत्नी दिवंगत रेखा माने यांचे नाव देण्यात येणार आहे. निधी प्रदान कार्यक्रमास ॲड. कुलकर्णी, कृष्णात वीर हे देखील उपस्थित होते.
मृत्यूनंतरही मानवसेवा; कोल्हापुरातील अरुण माने कुटुंबीयांकडून बालकल्याणला २९ लाखांची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 11:55 AM