नंदकुमार ढेरे -- चंदगड --शासनाच्या राष्ट्रीय पेयजल, भारत निर्माण टंचाई निवारण, आदी योजनांतून चंदगड तालुक्यातील २९ गावांत नळ पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांची कामे सुरू आहेत; पण गेली दीड-दोन वर्षे या योजनांना शासनाचा निधीच नसल्याने कामे ठप्प अवस्थेत आहेत. परिणामी, या गावांत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी २९ गावांना पाच कोटी आठ लाख रुपयांच्या निधीची गरज असून, शासनाने हा निधी त्वरित ग्रामपंचायतीकडे द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.शासनाच्या निकषांनुसार तालुक्याचा टंचाईग्रस्त आराखडा तयार करून नळ पाणी योजनांची कामे ठेकेदारांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरू केली. २९ पैकी मिरवेल, पारगड, किटवाड, हिंडगाव, अलबादेवी, गुडेवाडी, कानूर खुर्द, लाकूरवाडी, मजरे कार्वे, जंगमहट्टी पैकी धनगरवाडा, शिरोली पैकी सत्तेवाडी, हिंडगाव पैकी फाटकवाडी, कोकरे पैकी अडुरे, कागणी, गणुचीवाडी या गावांतील कामे पूर्ण आहेत. मात्र, अंतिम निधीच ठेकेदारांना मिळाला नाही.ढेकोळी, करेकुंडी, दिंडलकोप, सुंडी, बुक्किहाळ, कौलगे, महिपाळगड, माणगाव पैकी मलगड, मुगळी, नूलकरवाडी, दाटे पैकी नाईकवस्ती, नांदवडे, होसूर, दाटे पैकी बेळेभाट या १३ गावांतील योजनांची कामे निम्म्यांहून अधिक झाली आहेत. १६ गावांतील कामे पूर्ण करणाऱ्या बहुतांश ठेकेदारांनीच या १३ गावांतील कामाचे ठेके घेतले आहेत. त्यामुळे दोन्ही कामांत पैसे गुंतवून ठेकेदार कर्जबाजारी झाले आहेत.चंदगड तालुक्यात यावर्षी निम्म्यांहून अधिक पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे नैसर्गिक पाणीटंचाईचे संकट चंदगडकरावर आहे. त्यातच या योजनांना शासनाने निधीच देण्यास टाळाटाळ केल्याने पुन्हा कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शासनाने ठेकेदारांना या कामांसाठी एक किंवा दोन हप्ते दिलेले आहेत.पाणीपुरवठा विभागाचा व ग्रामपंचायतींचा तगादा असल्याने ठेकेदारांनी स्वभांडवल गुंतवून या योजनांची कामे पूर्ण करून घेतली आहेत. त्यातच दोन वर्षे शासनाने निधीच दिला नसल्याने ठेकेदार अडचणीत आले आहेत. काही ठेकेदारांनी या कामासाठी कर्जाऊ रकमा घेतल्या आहेत. निधीच नसल्याने कर्जाचे हप्ते कसे भरायचे, या विवंचनेत हे ठेकेदार आहेत. वरिष्ठ कार्यालयाकडून योजना पूर्ण करण्यासाठी कनिष्ठ कार्यालयाकडे तगादा लावला जातो. कामे पूर्ण झाल्यानंतरही निधी देण्यास मात्र टाळाटाळ केली जात आहे.यावर्षी पाऊस कमी झाल्याने तालुक्यालाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने २९ गावांच्या नळ पाणी योजनासाठी प्रलंबित असलेली पाच कोटी आठ लाखांचा निधी या महिनाअखेर दिल्यास प्रगतिपथावर असलेली नळ पाणी योजना पूर्ण होऊन काही प्रमाणात पाणीटंचाई कमी होईल.संभाव्य पाणीटंचाई तालुक्याला जाणवणार म्हणून पाणीपुरवठा विभागाने संबंधित गावांतील पाणी योजनेचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांना कामे पूर्ण करण्यासाठी तगादा लावला जात आहे. मात्र, निधीच नसल्याचे सांगत ठेकेदार कार्यालयाकडे पाठ फिरवित आहेत. निधीची तरतूद करा, मगच कामे करू, असा पवित्रा या ठेकेदारांनी घेतला आहे. पाणीपुरवठा विभागाला निधी मिळावा, यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे.- शांताराम पाटील, उपसभापती, चंदगड पंचायत समिती.
२९ गावांत पाणी योजनेची कामे ठप्प
By admin | Published: January 22, 2016 11:01 PM