कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांनी सोमवारी रायगड जिल्ह्यातील महाड, परिसरातील गावे व तळीये येथील पूर व दुर्घटनाग्रस्त ठिकाणांना भेट दिली. यावेळी त्यांनी रायगड प्राधिकरणाच्या ८० एकर जागेपैकी तीन एकर जागा तळीये गावच्या पुनर्वसनासाठी देण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी तळीये या गावी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमूखी पडलेल्या ८० जणांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे, स्थानिक प्रशासकीय अधिकारी, तळीये गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते. रायगड विकास प्राधिकरणाकडे दुर्गराज रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे ८० एकर जमीन संपादित केलेली असून याठिकाणी प्राधिकरणामार्फत शिवकालीन वस्तुसंग्रहालये व माहिती व इतिहास संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. यावेळी संभाजीराजे यांनी रायगड जिल्हाधिकारी व गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क करून प्राधिकरणाची तीन एकर जागा तळीये गावाच्या पुनर्वसनासाठी देण्याची इच्छा व्यक्त केली. या गावाचे पुनर्वसन करताना घरांची रचना ऐतिहासिक शिवकालीन धाटणीने करून, स्थानिक संस्कृतीचे पुनरूज्जीवन करून या गावास जागतिक दर्जाच्या पर्यटनाशी जोडण्याची संकल्पना मांडली. यामुळे पुनर्वसनाबरोबरच पर्यटनाच्या माध्यमातून या ग्रामस्थांना रोजगारही उपलब्ध होईल. यावर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
तळीये ते पाचाड जवळपास ४० किमीचे अंतर पाहता शेतीसाठी येणाऱ्या अडचणी ग्रामस्थांनी मांडल्या. यावर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तळीये येथील शेतजमिनी शासनाच्या ताब्यात घेऊन तितक्याच क्षेत्राच्या शेतजमिनी पाचाड भागात देण्याबाबत प्रयत्न करू, असे सांगितले.
---
फोटो कोलडेस्कला संभाजीराजे रायगड भेट नावाने
ओळ : खासदार संभाजीराजे यांनी सोमवारी रायगडमधील पूरग्रस्त भागांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.
--