लोकमत न्यूज नेटवर्क
शिरोळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व दुर्बल घटकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ, इंदिरा गांधी वृध्दापकाळ आणि दिव्यांग यांचे शासनाकडून मिळणारे अनुदान एप्रिल महिन्यात देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे हे अनुदान तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे. हे अनुदान मिळण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील व आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यामुळे तालुक्यातील विविध योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर ३ कोटी ९८ लाख रुपयांचे अनुदान जमा झाले आहे, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर यांनी दिली.
कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यातच संजय गांधी योजनेसह अन्य योजनेतील लाभार्थ्यांची पेन्शन न मिळाल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. दरम्यान, एप्रिल व मे महिन्यातील ३ कोटी ९८ लाख रुपये अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. लाभार्थ्यांनी बँकांमध्ये गर्दी न करता पेन्शनचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकाश पाटील-टाकवडेकर, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे, नायब तहसीलदार संजय काटकर यांनी केले आहे.