राम मगदूम
गडहिंग्लज : सुमारे ५० फुट खोल विहिरीत पडलेल्या साडेपाच फूट लांबीच्या अत्यंत विषारी जातीच्या घोणस सापाला एका जिगरबाज सर्पमित्राने जीवदान दिले.त्याचे नाव आहे,आप्पासाहेब ऊर्फ आप्पा मारूती दुंडगे. जरळी (ता.गडहिंग्लज ) येथील तब्बल तीन तासांच्या थरारक घटनेची गडहिंग्लजसह सीमाभागात जोरदार चर्चा आहे.हकीकत अशी,१५ दिवसांपूर्वी जरळी येथील ग्रामपंचायत सदस्य रवींद्र दुंडगे यांच्या घरानजीकच्या शेतातील विहिरीत घोणस जातीचा साप अचानकपणे पडला होता. नूल - भडगाव मार्गावरील जरळी बस थांब्यानजीकच्या या विहिरीचे पाणी त्या परिसरातील नागरिक पिण्यासाठी वापरतात.त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना धोका नको म्हणून गावातील सर्पमित्र आप्पा आणि काही तरुणांनी त्या सापाला पाण्यातून बाहेर काढण्याचा निर्धार केला.त्यासाठी भरपूर प्रयत्नही केले.परंतु, झाडा- झुडपांनी वेढलेल्या त्या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय नसल्याने अडचणी येत होत्या.त्यामुळे विहिरीच्या तीन्ही बाजूंनी दोर बांधण्यात आले.त्या दोरीच्या सहाय्याने सर्पमित्र आप्पा विहिरीत उतरला.दगडांच्या फटीत बसलेल्या 'त्या' सापाला त्यांने जिवंत पकडले.'त्या' सापासह आप्पालाही दोरीच्या सहाय्याने विहिरीतून वर काढण्यात आले.त्यानंतर त्या सापाला आजरानजीकच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.दोनवेळा साप अंगावर...!पहिल्यांदा आप्पाने त्या सापाला बादलीत घालून वर काढण्याचा प्रयत्न केला.परंतु,बादली निम्यावर जाताच साप बादलीतून पुन्हा विहिरीतील पाण्यात पडला.त्यानंतर त्याने काठीच्या साह्याने सापाला विहिरीतून वर नेण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी काठीतून निसटून तो साप पुन्हा खाली पडला.
दोनवेळा साप अंगावर पडता- पडता बचावल्यानंतर त्याने साप पकडण्याच्या काठीनेच त्याला पकडले.त्यावेळी सापाने त्या काठीलाच वेटोळे घातले.एका हातात सापाची काठी आणि दुसऱ्या हाताने दोर पकडलेल्या आप्पाला विहिरीच्या काठावर थांबलेल्या तरूणांनी सापासह सुखरूप वर काढले. त्यामुळे काळीज चिरणाऱ्या त्याच्या फुत्काराची आणि त्याला पकडण्याच्या थराराचीच चर्चा पंचक्रोशीत रंगली आहे.