येथील जुना राजवाडा चौकातील दत्तात्रय मोरेश्वर फाटक यांच्या घराच्या दरवाजाचे कडी कोयंडे उचकटून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम ४० हजारासह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. घरात कोणी नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. फाटक कुटुंब बुधवारी दुपारी घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. याबाबतची फिर्याद दत्तात्रय फाटक यांनी कुरुंदवाड पोलिसांत दिली आहे.
दरम्यान, सायंकाळी ठसेतज्ञांचे पथक व बेली नामक श्वानाला पाचारण करण्यात आले. श्वान परिसरातच घुटमळत राहिला तसेच इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली .
पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी फाटक सोमवारी (दि. ५) घराला कुलूप लावून कुटुंबासह परगावी गेले होते. घरात कोणी नसल्याचे ओळखून अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप उचकटून तिजोरीतील रोख ४० हजार रुपये, गंठण, नेकलेस, नथ, टाँप्स, गोठ अशा सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदीचे ताट, कंबरपट्टा असे ७५ हजार रुपये किमतीचे चांदीच्या वस्तू अशा ३ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे करत आहेत.