कोल्हापूर : यंदाच्या वृक्षलागवड मोहिमेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ९२ हजार ८५३ रोपे लावण्यात आली असून वृक्षलागवड मोहीम जिल्ह्यात गतिमान करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांनी दिली.यंदाच्या वृक्षारोपण मोहिमेस १ जुलै रोजी संपूर्ण जिल्ह्यात सुरुवात झाली. मोहिमेंतर्गत जिल्ह्यास २५ लाख ५९ हजार ८७० झाडे लावण्याचे उद्दिष्ट असले तरी ४ हजार ६८२ साईटस्वर प्रशासन आणि लोकसहभागातून २७ लाख २९ हजार ३३९ झाडे प्रत्यक्षात लावण्याचा प्रशासनाचा संकल्प आहे.जिल्हा वृक्षराजीने फुलविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात वृक्षारोपणाला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली शासन यंत्रणा आणि लोकसहभागाव्द्वारे जिल्ह्यात या मोहिमेंतर्गत रोपे लावण्याचे नियोजन केले.
या वृक्षलागवड मोहिमेचे आॅनलाईन नियंत्रण केले असून सर्व यंत्रणातील अधिकाऱ्यांमार्फत वृक्षलागवड कार्यक्रमाची दैनंदिनी वनविभागाला पाठविली जाते. वृक्षलागवड कार्यक्रमाचे स्थळ, वेळ आणि लोकसहभागाचे वेळापत्रक तयार केले. केलेले काम वनविभागाच्या संकेतस्थळावर फोटो, व्हिडीओ आणि लावलेल्या रोपापासून अपलोड केले जात आहे.मोठ्या प्रमाणावर झाडे लावून हरित जिल्हा घडविण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणा गतिमान झाल्या असून रानमळाच्या धर्तीवर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमार्फत झाडे लावण्याचे नियोजन असून शुभमंगलवृक्ष, आनंदवृक्ष, गृहप्रवेशवृक्ष, शुभेच्छावृक्ष अशा नावीन्यपूर्ण उपक्रमावर भर दिला आहे.
याशिवाय वाढदिवस, विविध आनंदाचे क्षण, विवाह, जन्म, मृत्यू अशा पद्धतीने कुटुंबांची माहिती संकलित करून वृक्षारोपणावरही भर दिला आहे. याशिवाय माहेरची झाडी यांसारखे उपक्रमही राबविण्यावर भर दिल्याचाही डॉ. शुक्ल म्हणाले.
आतापर्यंत विभागामार्फत केलेली वृक्षलावड
- - वनविभाग : १ लाख ९७ हजार ७२३ झाडे
- - सामाजिक वनीकरण विभाग : १ लाख ४७ हजार ७३२ झाडे
- - एफडीसीएम अंतर्गत : २७ हजार १००
- - ग्रामपंचायत विभाग : १२ हजार ७३४,
- - कृषिविभाग : ६ हजार ८०९
- - महसूल विभाग : २५५
- -नगरविकास विभाग : १००
- - अन्य विभागामार्फत ४०० रोपे