विश्र्वास पाटील कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाने भाडेतत्त्वावर घेतलेली राजारामपुरीतील मिरचीपूड विक्री केंद्राची जागा मूळ मालकाला परत देण्यात संघाचे मुख्य व्यवस्थापक आप्पासाहेब निर्मळ यांनाच जास्त रस होता, असे उपलब्ध कागदपत्रांवरून पुढे आले आहे.
संघाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना व पॅनेलप्रमुखांना हाताशी धरून हा व्यवहार झाला आहे. त्यामध्ये किमान १५ लाखांचा डल्ला मारला असल्याची माहिती पुढे येत आहे. संचालक मंडळाच्या मंगळवारी (दि. ३) झालेल्या बैठकीत यावरून मोठे वादंग माजले. संचालक मंडळाची मासिक सभा येत्या ११ तारखेला होत आहे. त्यामध्ये यावरून अध्यक्ष-उपाध्यक्षांसह व्यवस्थापकांनाही जाब विचारण्यात येणार आहे.मंगळवारी झालेल्या बैठकीस सत्तारूढ गटाचे नेते व माजी अध्यक्ष युवराज पाटील, संघाचे अध्यक्ष अमरसिंह माने, उपाध्यक्ष भैय्यासाहेब भुयेकर, व्यवस्थापक निर्मळ, संचालक सर्वश्री. राजू पाटील टाकवडेकर, बाळकृष्ण भोपळे, शशिकांत पाटील-चुयेकर, जी. डी. पाटील, विजयकुमार चौगले, व्यंकाप्पा भोसले हे उपस्थित होते.
या बैठकीत अध्यक्ष-उपाध्यक्षांसह व्यवस्थापकांच्याही राजीनाम्याची जोरदार मागणी झाली. संघाने राजारामपुरीतील (सि.स.नं. १७३७, ई वॉर्ड) ही १७० चौरस फूट जागा जागामालक अजित रामचंद्र तावडे यांच्याकडून १९९१ ला सुरुवातीला औषध दुकानासाठी भाड्याने घेतली. त्यानंतर तिथे मिरचीपूड विक्री केंद्र सुरू केले. गेली आठहून अधिक वर्षे हे केंद्र सुरू होते. महिन्याला सरासरी लाख रुपयांची उलाढाल तिथे होत होती.
या गाळ्याच्या संघाने गेली १० वर्षे भाडे न दिल्याने व ही इमारत विकसित करणार असल्याने ती परत द्यावी, अशी मागणी अजित तावडे यांच्यावतीने त्यांचे भाऊ व वटमुखत्यार किशोर तावडे यांनी संघाकडे ८ मार्च २०१९ रोजी केली. त्याचा आधार घेऊन संघाने १२ नोव्हेंबर २०१९ रोजी ही जागा मूळ मालक तावडे यांच्या ताब्यात दिली. ही जागा ताब्यात देताना ११ नोव्हेंबर २०१९ च्या संचालक मंडळाच्या बैठकीत तसा ठराव झाल्याचे सांगण्यात येते; परंतु बहुतांश संचालकांचे असा कोणताच ठराव झाला नसल्याचे म्हणणे आहे.
व्यवस्थापक निर्मळ यांनी या जागेची कागदपत्रे सापडत नसल्याने आपण ही जागा त्यांची त्यांना परत देऊया, असा उदार दृष्टिकोन बाळगला आहे; परंतु जागेचे वटमुखत्यारपत्र व तत्सम अन्य कागदपत्रे संघाच्या मुख्यालयातच उपलब्ध आहेत. ही कागदपत्रे काही संचालकांनी मंगळवारच्या बैठकीत चक्क अध्यक्ष माने यांच्या पुढ्यात टाकली. त्यावर त्यांनी हा निर्णय घेण्यात माझी चूक झाल्याची कबुली दिली.
अध्यक्षच जर असे बैठकीत सांगत असतील तर मग संघ नेमका चालविते कोण हा प्रश्न पुढे आला आहे. संघाच्या मोक्याच्या जागा त्यांचे मालक शोधून त्यांच्याशी अर्थपूर्ण व्यवहार करून खासगी मालकांच्या घशात घालण्यासाठी काहीजण प्रयत्नशील असल्याची चर्चा संघाच्या वर्तुळात आहे. संघाचे नेते आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांनी आपण ज्यांना निवडून दिले, ते लोक काय करतात, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
किती ही तत्परता...संचालक मंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्तात नंतर जागा देण्यासंबंधीचा बोगस ठराव घुसविण्यात आल्याचा संचालकांचा आरोप आहे. बैठक ११ नोव्हेंबरला झाली व लगेच दुसऱ्या दिवशीच निर्मळ यांनी जागा ताब्यात देत असल्याचे पत्र स्वत:च जागामालकांना दिले आहे. हे निर्मळ संघाचे व्यवस्थापक आहेत की जागामालकाचे वटमुखत्यार अशी शंका यावी, असा हा व्यवहार झाला आहे.
मी दवाखान्यात आहे. त्यामुळे मला या क्षणाला काही माहिती देता येणार नाही. मी ‘लोकमत’शी या विषयावर आज, गुरुवारी बोलू शकेन.- आप्पासाहेब निर्मळ, मुख्य व्यवस्थापक,शेतकरी सहकारी संघ