कोल्हापूर : येथील क्रांतिसिंह नाना पाटील नगरातील सुलोचना पार्कमध्ये घरातच थाटलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी १६ जानेवारीला छापा टाकून कारवाई केली होती. या गुन्ह्यातील आणखी तीन एजंटना करवीर पोलिसांनी अटक केली. मुख्य सूत्रधार स्वप्निल केरबा पाटील (रा. बालिंगा, ता. करवीर) याचा यापूर्वी मुरगुड आणि राधानगरी येथील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या रॅकेटमध्ये सहभाग होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.प्रदीप बाजीराव कोळी (वय ४२, रा. वळीवडे, ता. करवीर), पंकज नारायण बारटक्के (वय ३३, रा. सुलोचना पार्क, कोल्हापूर) आणि निखिल रघुनाथ पाटील (वय ३०, रा. धामणवाडी, ता. राधानगरी) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. हे तिघे एजंट असून, त्यांनी गर्भलिंग निदानासाठी ग्राहक शोधून ते बोगस डॉक्टर पाटील याच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम केले.मुलगा होण्याचे औषध देण्याचा दावा करण्यासह अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटची व्याप्ती वाढत आहे. छाप्याची कारवाई केल्यानंतर करवीर पोलिसांनी टेक्निशियन अमित केरबा डोंगरे (वय ३३, रा. सुलोचना पार्क) आणि एजंट कृष्णात आनंदा जासूद (वय ३३, रा. निगवे दुमाला, ता. करवीर) या दोघांना अटक केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्निल पाटील याला फुलेवाडी चौकात जेरबंद केले.यानंतर आणखी तीन एजंटना पोलिसांनी अटक केली. गेल्या दीड ते दोन वर्षांंपासून यांचे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय होते. मात्र, प्रत्येकी दोन ते तीनच रुग्ण तपासणीसाठी पाठवल्याची कबुली ते देत आहेत, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांनी दिली. तर बोगस डॉक्टर पाटील याचा गेल्या वर्षी मुरगुड आणि राधानगरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अवैध गर्भलिंग निदान गुन्ह्यातही सहभाग असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
सोनोग्राफी मशीन विक्रेत्याचा मृत्यू?गर्भलिंग तपासणीसाठी वापरलेले पोर्टेबल सोनोग्राफी मशीन कागल तालुक्यातील एका व्यक्तीकडून दोन वर्षांपूर्वी विकत घेतल्याचे बोगस डॉक्टर पाटील याने पोलिसांना सांगितले. मात्र, मशीन विकलेला व्यक्ती सध्या हयात नाही. त्यामुळे मशीन नेमके कोणाकडून आणले याची ठोस माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही.
एक गर्भपात केल्याची कबुलीसंशयितांनी एका महिलेचा गर्भपात केल्याची कबुली चौकशीत दिली आहे. संबंधित महिला करवीर तालुक्यातील आहे. संशयितांनी दीड वर्षात अनेक महिलांचा गर्भपात केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.